एमपीसी न्यूज – शहरातील क्रीडा संस्कृती जपण्यासाठी तसेच जास्तीत जास्त खेळाडूंना (Pimpri) राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर नावलौकीक मिळावा, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळावे यासाठी महापालिकेच्या वतीने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराला क्रिडाविषयक वेगळी ओळख देण्यासाठी सी.एस.आर उपक्रमातंर्गत अधिकाधिक कंपन्यांमधील अनुभवी प्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि मनुष्यबळ महापालिकेस हवे आहे, असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सी.एस.आर कक्ष अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या तसेच विविध उद्योग समुह यांच्याद्वारे सी.एस.आर अंतर्गत सामाजिक उपक्रम राबवून त्याचा वापर शहरातील क्रिडाविषयक सोयीसुविधांसाठी करता यावा यासाठी चिंचवड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी अतिरिक्त आयुक्त खोराटे बोलत होते.
Alandi : शहरात सर्वत्र डास प्रतिबंधात्मक फवारणी होणे गरजेचे – दिगंबर पुराणे
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा मुख्य सी.एस.आर सेल प्रमुख निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, सीएसआर सेलच्या सल्लागार श्रुतिका मुंगी तसेच एसकेएफ, एरेमंड, सॅडविक कोरोमंट, सीआयआय, टाटा ब्लू स्कोप, फुजित्सू, बजाज ऑटो, ऍटलास कॉपको, हंट्समन, अल्केजेन, केएसबी, निर्माण, डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट्स, सेल्नी इंडस्ट्रीज, फोर्स मोटर्स, या कंपन्यांचे सी.एस.आर सेलचे प्रतिनिधी तसेच क्रीडा स्पोर्ट्स, इक्वेस्ट्रियन, सह्याद्री फाऊंडेशन, रोटरी क्लब निगडी या (Pimpri) संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, शहराला पायाभूत सुविधा पुरविताना शैक्षणिक, वैद्यकीय, आरोग्य तसेच पर्यावरणावर लक्ष केंद्रित करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. त्यातील काही प्रकल्पांमध्ये किंवा विकासकामांमध्ये सी.एस.आर निधीचा महत्वाचा वाटा आहे. सी.एस.आर निधीसोबत शहरातील विविध कंपन्यांच्या अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शनही महापालिकेस लाभले आहे. हेच मार्गदर्शन आणि मनुष्यबळ क्रिडाविषयक सोयीसुविधांमध्येही लाभले तर भविष्यात पिंपरी चिंचवड शहर हे उद्योगनगरीसोबत क्रिडानगरी म्हणूनही ओळखली जाईल. पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर खेळामधील कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी यासाठी महापालिकेच्या वतीने अनेक सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, कुस्ती संकुल, हॉकी मैदान, क्रिकेट अकादमी आदींचा समावेश आहे. प्रस्तावित प्रकल्पांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन हॉल, क्लायम्बिंग वॉल, रेस कोर्स मैदान, कुस्ती संकुल या प्रकल्पांचा समावेश आहे. योग्य शहराचे आणि देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि सोयीसुविधांची गरज असते. या सर्व गोष्टी पुरविण्यासाठी महापालिका नेहमी कटिबद्ध असून सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून या खेळाडूंच्या पखांना आणखी बळ मिळण्यास आणखी मदत मिळेल.
सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे क्रीडा विभाग, क्रीडा धोरणाचे उद्दिष्ट, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन, शहरातील खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये केलेली चमकदार कामगिरी, शहरातील क्रिडाविषयक पायाभूत सुविधा, क्रीडा विभागामार्फत सुरू असलेले उपक्रम, क्रिडाविषयक प्रस्तावित प्रकल्प आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित उद्योग समुहाच्या तसेच संस्थांच्या प्रतिनिधींनी संगणकीय सादरीकरणाद्वारे त्यांनी क्रिडाविषयक क्षेत्रात केलेल्या सामाजिक कामगिरीची तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती (Pimpri) दिली.