एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील (Pimpri Chinchwad Police Recruitment)262 पोलीस शिपाई पदांसाठी पोलीस भरती सुरु आहे. भरतीची लेखी परीक्षा शनिवारी (दि. 10) सकाळी दहा वाजता ताथवडे पुणे येथील श्री बालाजी विद्यापीठ येथे पार पडली. 262 जागांसाठी 2989 उमेदवारांना बोलवण्यात आले. त्यातील 2828 उमेदवार लेखी परीक्षेसाठी हजर राहिले.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात 262 पडे भरली जाणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी 79 पदे, महिला 78 पदे, खेळाडू 15 पदे, प्रकल्पग्रस्त 14 पदे, भूकंपग्रस्त 4 पदे, माजी सैनिक 41 पदे, अंशकालीन पदवीधर 11 पदे, पोलीस पाल्य 7 पदे, गृहरक्षक दल 13 पदे, अनाथ 3 पदे राखीव आहेत.
पोलीस भरतीची लेखी परीक्षा शनिवारी सुरळीत पार पडली. लेखी परीक्षे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी चोख नियोजन केले. परीक्षा केंद्रावर योग्य बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत वरिष्ठ लक्ष ठेवून होते.
लेखी परीक्षेसाठी राज्याच्या विविध भागातून उमेदवार पिंपरी चिंचवड शहरात आले होते. काही उमेदवार शुक्रवारी रात्री परीक्षा केंद्रावर आले. या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांची पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे महिला आणि पुरुष उमेदवारांची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था केली. शनिवारी सकाळी या उमेदवारांना चहा-नाश्ता देखील देण्यात आला. शुक्रवारी रात्री सुमारे 350 उमेदवार मुक्कामी होते.
Thergaon : थेरगाव रुग्णालयातील पाण्याच्या फिल्टरमध्ये आळ्या
लेखी परीक्षेसाठी चार पोलीस उपायुक्त, नऊ सहाय्यक पोलीस आयुक्त, 31 पोलीस निरीक्षक, 133 सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, 444 पोलीस अंमलदार आणि 20 वार्डन असा बंदोबस्त लावण्यात आला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे भरती प्रक्रियेचे दक्षता अधिकारी आहेत. अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी हे प्रभारी अधिकारी तर पोलीस उपायुक्त (मुख्यालय) माधुरी कांगणे-केदार या समन्वय अधिकारी आहेत.
12 हजार उमेदवार मैदानी मधूनच बाहेर
पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 262 जागांसाठी राज्यभरातून 15 हजार 42 अर्ज आले. त्यामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनिअर यासह पदव्युत्तर पदवी धारकांचा देखील समावेश होता. दोन तृतीयपंथी उमेदवारांनी देखील अर्ज केला. मात्र मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होऊन लेखीसाठी अवघे दोन हजर 989 उमेदवार पात्र ठरले. उर्वरित 12 हजार 53 उमेदवार मैदानी चाचणी मधूनच बाहेर पडले.
161 उमेदवार लेखीसाठी गैरहजर
पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात 262 पोलीस शिपाई पदांची भरती सुरू आहे. या भरतीसाठी 15 हजार 42 उमेदवारांनी अर्ज केले. त्यातील 12 हजार उमेदवार मैदानी चाचणीत अपयशी ठरले. तर उर्वरित 2989 उमेदवारांना लेखीसाठी बोलवण्यात आले. लेखी परीक्षेसाठी 161 उमेदवार गैरहजर राहिले. तर 2828 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली.