एमपीसी न्यूज – नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ (Nigdi) आणि अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 31 व्या नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेत जुबेन अलिफ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, निगडी प्राधिकरण येथे रविवार (दि.11) ज्येष्ठ कवी अशोक कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा संपन्न झाली.
यावेळी नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, सचिव माधुरी ओक, सह सचिव अश्विनी कुलकर्णी, संपतराव शिंदे, दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
काव्यलेखन स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे 92 कवींपैकी सुमारे 65 कवींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कविता सादरीकरण केले. त्यामध्ये विजेत्या ठरलेल्या कवींचा तपशील खालीलप्रमाणे :-
जुबेन अलिफ (प्रथम), उमेंद्र बिसेन (द्वितीय), स्मिता धर्माधिकारी (तृतीय), शशिकला देवकर आणि गणेश भुते (उत्तेजनार्थ)
विना शुल्क असणा-या या स्पर्धेत, विजेत्या कवींना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रशस्तिपत्र आणि पुष्प प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर सहभागी सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. ज्येष्ठ कवयित्री वर्षा बालगोपाल आणि ज्येष्ठ कवी अरुण कांबळे यांनी परीक्षण केले.
Alandi: कचरा मुक्त शहर पथनाट्यद्वारे शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती
आजोबा (अनंत घोगले) आणि नात (युगंधरा घोगले) यांचे एकत्रित कविता सादरीकरण तसेच शंभू चव्हाण (भाऊ), सान्वी चव्हाण (बहीण) आणि प्रदीप चव्हाण (वडील) असा एकाच कुटुंबातील कवींचा सहभाग अशा वेगवेगळ्या (Nigdi) वैशिष्ट्यांमुळे स्पर्धा आगळीवेगळी ठरली. अखंड भारतमातेच्या प्रतिमापूजनाने पारितोषिक वितरण सत्राचा प्रारंभ करण्यात आला. नवयुगचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी प्रास्ताविकात सांगितले विषय, आशय, सादरीकरण आणि रसिकांचा प्रतिसाद हे स्पर्धेसाठी महत्त्वाचे घटक आहेत. यासाठी स्पर्धेची कविता ही पाठ हवी. मोबाइल आणि कागदामुळे सादरीकरणात अडथळा येत असतो.
जरी ओळखीची सर्व मंडळी असली तरी स्पर्धा नि:स्वार्थपणे घेतली जाते. म्हणूनच मंडळ ३१ वर्षे कार्यरत आहे. अरुण कांबळे यांनी परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. स्पर्धेत सहभागी न झालेल्या कवींच्या प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांनी प्रातिनिधिक कविता सादर केली. अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक अशोक कोठारी यांनी जुन्या अभ्यासक्रमातील ‘माझी शाळा’ ही कविता सादर करून कवितेतील लयबद्धतेचे महत्त्व अधोरेखित केले.
अनिकेत गुहे, रजनी अहेरराव, प्रा. पी. बी. शिंदे, चिंतामणी कुलकर्णी, शरद (Nigdi) काणेकर, मंगेश पोहणेकर, प्रदीप गांधलीकर, प्रा. तुकाराम पाटील, अरविंद वाडकर यांनी संयोजनात सहकार्य केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी विधाटे यांनी आभार मानले.