एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक (BJP) यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ऑगस्ट मध्ये भाजपाच्या संघटनात्मक सर्व 78 जिल्हे आणि पक्षाच्या सर्व 778 मंडलांमध्ये अधिवेशने तसेच विस्तारित कार्यकारिणी बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे, या अनुषंगाने भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्यावतीने शहरात शुक्रवारी, दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे जिल्हा विस्तारित कार्यकारणी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.
यावेळी, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, शितल शिंदे, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शैलाताई मोळक, प्रवक्ते तथा वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, दक्षिण भारतीय आघाडीचे राजेश पिल्ले, संकेत चौंधे, मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, संदीप नखाते, अमेय देशपांडे आदी पदाधिकारी -कार्यकर्ते उपस्थित होते.
Pune: पीएमपीएमएल ची संपूर्ण माहिती मिळणार केवळ एका टच वर, “आपली पीएमपीएमएल” अॅप होणार लॉन्च
या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार राज्यसभा तथा राष्ट्रीय महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रा.डॉ.मेधाताई कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनांमधून भाजपाची विविध मुद्द्यांवरील भूमिका आणि आगामी काळात पक्षाची वाटचाल कशी असावी, या विषयांवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून जिल्हा, मंडल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
पुणे येथे 21 जुलै रोजी झालेल्या प्रदेश अधिवेशनाच्या धर्तीवर संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये तसेच सर्व मंडलांमध्ये ही अधिवेशने आणि बैठका घेण्यात येत आहेत, अशी माहितीही शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी आणि नियोजन कसे असावे तसेच पक्षाची रणनीती याविषयी मार्गदर्शन पक्षाचे वरिष्ठ नेते या अधिवेशनांमधून करणार आहे.
पुणे येथील अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले मार्गदर्शन, दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी जिल्हा, मंडल स्तरावर करण्याच्या दृष्टीने या अधिवेशनांमध्ये चर्चा होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना पक्षाच्या वाटचालीबाबत माहिती देण्याचा उद्देश या अधिवेशनांचा असल्याचेही त्यांनी (BJP) सांगितले.