एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर (Chinchwad) पोलीस गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक घेतात. या बैठकीत वर्गणी जमा करणे, मिरवणूक काढणे, नागरिकांची सुरक्षा अशा सर्व बाबींबाबत पोलिसांकडून सूचना दिल्या जातात. मात्र यंदाचा गणेशोत्सव अवघ्या तीन आठवड्यांवर आला असून पोलिसांकडून अद्याप बैठकीचे आयोजन करण्यात आलेले नाही.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत पिंपरी चिंचवड महापालिका, आळंदी, चाकण, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, देहु नगरपंचायत, देहू कँटोन्मेंट बोर्ड, हिंजवडी ग्रामपंचायत असा मिश्र परिसर येतो. या भागात शेकडो गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सव अवघ्या तीन आठवड्यांवर आला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे. वर्गणी जमा करणे, जमा झालेल्या वर्गणीतून देखावे, विद्युत रोषणाई व इतर कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे.
काही गणेशोत्सव मंडळाकडून दुकानदार, व्यवसायिक यांच्याकडून जबरदस्तीने हवी तेवढी वर्गणी घेतली जाते. प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बड्या हस्तींचे फोन आणले जातात. त्यामुळे वाद विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण होते.
Chikhali : विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू
वर्गणी वरून कोणतेही वाद निर्माण होऊ नये, गणेशोत्सव (Chinchwad) शांततेत आणि उत्साहात पार पडावा. गणेशोत्सव मंडळांच्या अडचणींचे निराकरण करता यावे, यासाठी गणेशोत्सव मंडळे आणि पोलीस यांची बैठक होते. मात्र यावर्षीची ही बैठक अद्याप झालेली नाही.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे म्हणाले, पोलीस आणि गणेशोत्सव मंडळांची बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. दरम्यान गणेशोत्सव मंडळांनी वर्गणी घेताना कुणावरही जबरदस्ती करू नये. तशा प्रकारची तक्रार आल्यास संबंधित मंडळे व त्यांच्या पदाधिकारी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.