एमपीसी न्यूज – तब्बल 25 वर्षानंतर देहूगावातील रयत शिक्षण संस्थेच्या (Dehugaon)संत तुकाराम विद्यालय व संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू या शाळेतील सन 1999-2000 या वर्षातील विद्यार्थी विद्यार्थिनी “सुवर्णक्षण आठवणींचे” या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले. तब्बल 25 वर्षानंतर आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना एकत्र पाहून प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद ओसंडून वाहत होता.. अनेक मित्र-मैत्रिणींच्या जुन्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.
25 वर्षांपूर्वीचे शाळेचे ते दिवस, प्रत्येकाच्या आठवणी शब्दांमध्ये व्यक्त होताना सर्व वातावरण भारावुन गेले. शाळेचे दिवस हे प्रत्येकासाठी खूपच अविस्मरणीय असतात. पुढे जीवनाच्या वाटेवर वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक मित्र भेटतात, परंतु शाळेच्या बालपणीच्या मित्राची तोड त्याला येत नाही.. अशीच भावना प्रत्येकाची यावेळी दिसून आली. शाळेतली ती भांडण, शाळेत आपल्या मित्र-मैत्रिणींवर रूसणं-फुगणं किंवा शाळेतल्या वर्गातील मस्ती, त्या खोड्या करणे या सर्वच विषयांची अतिशय मनापासून चर्चा या ठिकाणी रंगलेली दिसून आली. 25 वर्षानंतर पुन्हा शाळेच्या त्या दिवसात जाऊन प्रत्येकानी कार्यक्रमात सहभाग घेतला 125 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले शाळेच्या दिवसातील कलाविष्कार अनेकांनी सादर केले. शारदा म्हाळसकर, अनुराधा मोरे यांनी सुंदर आवाजात गीत सादर केले. प्राजक्ता मोरे व अभिजीत कंद यांनी सुंदर कविता सादर केली. एकत्रित येऊन नृत्य सुद्धा सर्वांनी केले.
जीवनाचा हा आनंद उत्सव असाच कायमस्वरूपी प्रत्येकाच्या जीवनात टिकून राहावा असंच सर्वांना वाटत होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध खेळ, मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. या मनोरंजनात्मक स्पर्धेच्या प्रसंगी हसून हसून सर्व जणांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आले. कार्यक्रमाचा प्रारंभ संत तुकोबारायांच्या प्रतिमेचे पूजन व प्रार्थना म्हणून करण्यात आली. याप्रसंगी सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भावना व्यक्त करताना काहींना आपले अश्रु अनावर झाले.. विशेषतः मुलींनी आपल्या भावना व्यक्त करताना मुली एकदा संसारामध्ये गुंतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या माहेराला येणे ही दुर्मिळ गोष्ट होऊन जाते. त्यांच्या अनेक गोष्टींना मर्यादा येतात. अशा प्रसंगी पुन्हा एकदा 25 वर्षांनी शाळेतल्या सर्व मित्र-मैत्रिणींसोबत असा कार्यक्रम झाल्यामुळे पुन्हा सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. एक आनंदाचा दिवस आम्हाला अनुभवायला मिळाला. मित्र मैत्रिणी यांच्याशी छान गप्पांतुन आपल्या शाळेतील दिवसांच्या आठवणीं व्यक्त करता आल्या. मनसोक्त गप्पा मारता आल्या. मोबाईलच्या आभासी जगात आपण फक्त मोबाईलवर मेसेज व दुरून फोनवर बोलू लागलो पण प्रत्यक्षात येऊन गप्पा मारणे, मनमूराद हसणे यातून व्यक्त होणारा आनंद हा या मोबाईलच्या जगापलीकडचा आहे. हे सुद्धा या ठिकाणी दिसून आले.
Former DGP Sanjay Pandey : माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची मोठी घोषणा
जवळजवळ पाच ते सहा तास या कार्यक्रमात कसे सहज गेले हे कोणाला समजले नाही. कार्यक्रमाचे निवेदन पुण्यातील सुप्रसिद्ध निवेदिका मयुरी परब यांनी केले. चित्रकार सन्मेश पांडे यांनी सुंदर रांगोळी काढली. कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी विजय ठाणगे, विकास कंद,सागर मोरे, सचिन काळोखे, विजय मोरे, अजिंक्य साकोरे, सुरेश गाडे, वैशाली मोरे, कावेरी काळोखे, ज्योती काळोखे, आशा झेंडे, नमिता टिळेकर, रविंद्र काळोखे,अभिजीत कंद, प्रविण पिंजण,सचिन लिंभोरे,वसंत भसे यांनी विशेष कष्ट घेतले. सर्वांचा समन्वय व संवाद घडून आणण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचा समारोप केक कापून करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार विकास कंद यांनी मानले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी शाळेच्या मैदानात देशी वृक्ष लावण्याचा संकल्प केला व ती झाडे आपण संगोपन करून चांगल्या पद्धतीने वाढवुया अशा पद्धतीने एक संकल्प केला.
लवकरच ही झाडे शाळेच्या प्रांगणात लावण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. पंचवीस वर्षांनी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेला अतिशय सुंदर सोहळा गावातील सर्वांच्याच साठी कौतुकाचा विषय ठरला आहे. कारण याच बॅचमधील मुलांनी वीस वर्षांमागे एकत्र येऊन देहू गावात अभंग प्रतिष्ठानची स्थापना केली. गावासाठी संत तुकाराम ग्रंथालय या नावाने ग्रंथालय उभे केले. अनेक सेवाभावी सामाजिक- शैक्षणिक उपक्रम सातत्याने घेणारी ही एक आदर्श सामाजिक संस्था आहे. देहूगाव व पंचक्रोशीत सामाजिक कार्यात अत्यंत सेवाभावनेने काम करणारी हे सर्व तरुण व त्यांचे कार्य निश्चितपणे येणाऱ्या भावी पिढींना देखील प्रेरणादायी आहे.