Explore

Search
Close this search box.

Search

November 15, 2024 6:13 am

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

BJP : भाजपला लागलेली गळती विधानसभेसाठी धोक्याची घंटा; आयारामांमुळे निष्ठावंतांची कोंडी – अमोल थोरात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या (BJP) स्थानिक नेत्यांकडून तसेच शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर्गत दुही माजवली आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे भाजपाचे अमोल थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्राव्दारे कळविले आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून, भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे.

भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षाला लागलेल्या या गळतीबाबत संतप्त भावना व्यक्त करत अमोल थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व असताना भोसरी येथील दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी भारतीय जनता पार्टी शहरात रुजवली. भाजपाचे तत्कालीन शहराध्यक्ष असलेल्या अंकुशराव लांडगे यांनी शहरात पक्षाचे कार्यकर्ते तयार केले. विपरीत परिस्थितीत भाजपाचे दोन अंकी नगरसेवक निवडून आणले. त्यात बाबासाहेब लांडगे महापालिकेचे विरोधी पक्षनेता देखील झाले होते. त्यानंतर शहरात भाजपची ताकद वाढत गेली. या लांडगे कुटुंबाचे राजकीय वारस असलेले रवी लांडगे हे 2017 मध्ये भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले.

दरम्यान, पिंपरी- चिंचवड भाजपमध्ये आयारामांचीही गर्दी झाली. यामध्ये अनेकांना चांगली पदे बहाल करण्यात आली. त्यातील अनेकांनी पदांचा केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी वापर सुरू केला आहे. तसेच अंतर्गत (BJP) गटबाजी करून पक्षामध्ये दुही माजवली आहे. त्यामुळे पक्षामधील निष्ठावान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची कोंडी होत आहे. त्याला कंटाळून काही पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी पक्षातून बाहेर पडण्यास पसंती दिली आहे. यात एकनाथ पवार यांच्या पाठोपाठ आता रवी लांडगे हे देखील शिवसेनेत (उबाठा) गेले आहेत.

Moshi : संविधान भवनाच्या उभारणीसाठी वास्तू विशारद संस्थेला मंजुरी

अंकुशराव लांडगे यांचे पुतणे असलेले तसेच बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र असलेले रवी लांडगे हे भाजपचे सच्चे कार्यकर्ते मानले जातात. मात्र त्यांना पक्षाकडून कोणत्याही प्रकारची संधी मिळाली नाही. तसेच अंतर्गत गटबाजी करून त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू होता. याबाबत त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे सातत्याने भूमिका मांडली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक कुटुंब जोडण्यासाठी पक्षाला दोन ते तीन पिढ्यांपासून प्रयत्न करावे लागले. मात्र पक्षातील सध्याच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे हे कार्यकर्ते आणि कुटुंब पक्षापासून दूरावत आहेत. त्यामुळे भाजपची पिंपरी- चिंचवड शहर कार्यकारिणी तसेच कार्यकारिणीचे अध्यक्ष व शहरातील बडे पदाधिकारी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संघटन वाढविण्याऐवजी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर त्यांनी भाजपला नेऊन ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक बड्या पदाधिकाऱ्यांचे हे अपयशच आहे, असे दिसून येते. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून याची दखल घेण्यात यावी तसेच स्थानिक पातळीवर पिंपरी- चिंचवड शहर कार्यकारिणी व संबंधित स्थानिक नेत्यांवर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून पक्षातून बाहेर पडून कोणीही इतर पक्षांमध्ये जाणार नाही. अन्यथा भाजपला लागलेली गळती ही केवळ स्थानिक नव्हे तर इतरही निवडणुकांसाठी धोक्याची घंटा ठरेल, असे अमोल थोरात यांनी दिलेल्या पत्रात नमूद आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर