Explore

Search
Close this search box.

Search

January 13, 2025 8:12 pm

MPC news

PCMC : शहरात वाहनांच्या संख्येत 16 टक्क्यांनी वाढ

एमपीसी न्यूज – महापालिका क्षेत्रात (PCMC)एकूण नोंदणीकृत वाहनांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच इंधन प्रकारानुसार एकूण नोंदणीकृत वाहनांच्या 9 टक्के वाहने इलेक्ट्रिक वाहने असून त्यात गत वर्षीच्या तुलनेत मध्ये वाढ झालेली दिसून येते.

पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात येणारे विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा व त्यांचे शहराच्या पर्यावरणावर होणारे परिणाम यांचे मुल्यांकन करणारा सन 2023-24 चा ‘पर्यावरण सद्यस्थिती अहवाल’ आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे आज झालेल्या विशेष बैठकीत सादर करण्यात आला. शहरातील पाणीपुरवठा, जलनि:सारण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्ते, घनकचरा, हरितक्षेत्र, उद्यान विकास संवर्धन अशा अनेक सुविधा महापालिकेमार्फत पुरविल्या जातात. या सर्व सुविधांचे व्यवस्थापन करताना त्याचा शहराच्या पर्यावरणावर आणि नागरिकांच्या राहणीमानावर परिणाम होत असतो. त्या दृष्टीने पर्यावरण सद्यस्थिती अहवाल महत्वपूर्ण आहे. शहराच्या शाश्वत तसेच पर्यावरणपुरक विकासासाठी हा अहवाल दिशादर्शक ठरेल, असे आयुक्त सिंह यांनी यावेळी सांगितले.

शहराचे पर्यावरणीय मूल्यमापन करण्यासाठी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल ही एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. या अहवालाचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे रक्षण व शहराच्या शाश्वत विकास आराखड्याचे पारदर्शक मूल्यमापन करणे हा आहे, असे अतिरिक्त आयुक्त विजय कुमार खोराटे यांनी सांगितले.

Lonavala : लोणावळ्यात होणार जुन्या महामार्गाचे रुंदीकरण, ‘ओला- उबर’वर बंदी

महापालिकेचे विविध विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, विविध शासकीय, निम शासकीय कार्यालये यांच्याकडून प्राप्त झालेली पर्यावरणविषयक माहिती तसेच महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी केलेल्या वायू, ध्वनी, पाणी इत्यादी चाचण्यांच्या निकषांवर पर्यावरण सद्यस्थिती अहवाल आधारित आहे, अशी माहिती पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली. या अहवालात शहरवाढीला चालना देणारे घटक, नैसर्गिक साधनसंपत्ती व नागरी सुविधांवर पडणारा ताण, शहराची पर्यावरण सद्यस्थिती, पर्यावरणीय परिस्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि कृती कार्यक्रम यांची माहिती आहे. या अहवालानुसार पिंपरी चिंचवड शहरात सन 2022-23 मध्ये कमाल497.2 मिलीमीटर तर किमान 1.5 मिलीमीटर इतके पर्जन्यमान नोंदविले गेले आहे. सन 2022-23 मध्ये शहराचे सर्वाधिक तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

महापालिका क्षेत्रात एकूण नोंदणीकृत वाहनांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 16 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यात दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच इंधन प्रकारानुसार एकूण नोंदणीकृत वाहनांच्या 9 टक्के वाहने इलेक्ट्रिक वाहने असून त्यात गत वर्षीच्या तुलनेत मध्ये वाढ झालेली दिसून येते. गेल्या तीन वर्षात पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सी एन जी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढलेला दिसून येतो. ई-वाहन वापरण्यावर नागरिकांनी भर दिल्याचे यातून जाणवते. दरवर्षी नव्याने नोंदणीकृत होणाऱ्या वाहनांमध्ये भर पडत असल्याने वाहतूक कोंडी सारख्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. याचा विचार करून पिंपरी चिंचवड महापालिका रस्ते रुंदीकरण, नवीन रस्ते, उड्डाणपूल आदी उपाययोजना करत आहे. तसेच मेट्रोच्या विस्तारामुळे शहरातील वाहतूक सुविधा अधिक सुलभ होत असून वायु, ध्वनी, रस्त्यावरील ताण आणि वाहतूक कोंडी यावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

शहरातील एकूण लोकसंख्येपैकी 79.50 टक्क्के नागरिक साक्षर आहेत. त्यापैकी 57 टक्के पुरुष आणि 43 टक्के महिला साक्षर असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिकेच्या वतीने सन 2022.23 मध्ये 190 उद्याने विकसित करण्यात आली असून 32 लाख 16 हजार 749 झाडे लावण्यात आली आहेत. पिंपरी- चिंचवड शहराच्या औद्योगिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे या अहवालातून दिसून येते. शहरातील कारखान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

शहरामध्ये डिजिटल कनेक्टीव्हिटीची मागणी लक्षात घेता सार्वजनिक वाय- फाय सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. शहरातील सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, धुलीकण, अतिसुक्ष्म धुलीकणांची पातळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनानुसार विहीत मर्यादेमध्ये असल्याचा निष्कर्ष अहवालात नमूद करण्यात आला आहे. धुलीकणाचे प्रमाण हे सणासुदीच्या काळात विहित मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्याचेही या अहवालात नमूद केले आहे.

महानगरपालिकेच्या विविध मैलाशुद्धीकरण केंद्रांमध्ये संकलित होणाऱ्या केंद्रांमध्ये संकलित होणाऱ्या सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या मानांकनानुसार गुणवत्ता राखली जाते. शहरातील नद्यांच्या पाण्याची रासायनिक तपासणीची आकडेवारी या अहवालात नमूद करण्यात आली आहे. नदीमध्ये जाणारे सांडपाणी, कपडे, धुणे अशा विविध गोष्टींमुळे पाण्याची गुणवत्ता ढासळते. शहरातील सर्व नद्यांना मिळणारे नाले प्रदूषित असल्याचे या अहवालातून निदर्शनास येते. पवना नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत असल्याने अधिकांश नाले या नदीत मिसळतात तर इंद्रायणी नदी औद्योगिक क्षेत्रातून वाहत असल्याने या नद्या प्रदुषित होत असल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदविण्यात आला आहे. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी 38 टक्के हा ओला कचरा आहे. या कचऱ्यावर विविध प्रक्रिया करून त्याद्वारे ऊर्जानिर्मिती देखील करण्यात येते. तर वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा, रोजगार, व्यापार, शिक्षण,आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक तसेच मनोरंजन, क्षेत्रातील पायाभूत सुविधांमुळे पिंपरी चिंचवड शहराचे आकर्षण वाढले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गणेशोत्सव, दिवाळी, उत्सव तसेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यातील ध्वनी पातळीची आकडेवारी या अहवालात नमूद करण्यात आली आहे. सण-उत्सवाच्या काळात विशिष्ट ठिकाणी ध्वनी पातळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निर्धारित मानांकनापेक्षा वाढली असल्याचे अहवालात दर्शविण्यात आले आहे. महापालिकेने पर्यावरणपुरक राबविलेले उपक्रम, शासनाकडून मिळालेला निधी, विविध पारितोषिके आदी गोष्टींचा उहापोह या अहवालात करण्यात आला आहे.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर