एमपीसी न्यूज – भाजपचे माजी नगरसेवक आणि भोसरीतून विधानसभा निवडणूक (Pimpri) लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या रवी लांडगे यांनी शेकडो समर्थकांसह आज (मंगळवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, आमदार मिलींद नार्वेकर यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते. या पक्ष प्रवेशापूर्वी रवी लांडगे व त्यांच्या समर्थकांनी पिंपरी-चिंचवड ते मुंबईपर्यंत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तब्बल 500 हून अधिक गाड्या आणि हजारो कार्यकर्त्यासह लांडगे यांनी मातोश्रीपर्यंत जंगी शक्तीप्रदर्शन केले. या पक्ष प्रवेशाची भोसरीपासून ते पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे तसेच मातोश्रीपर्यंत पक्ष प्रवेशाची जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. लांडगे यांनी पक्षाकडून दिली जाणारी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे सांगितले. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी काम करणार असल्याचा इरादाही त्यांनी स्पष्ट केला.
भाजपचा राजीनामा दिल्यानंतर दोन वर्षांनी घेतला निर्णय
2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे हे भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून (Pimpri) निवडून आले होते. रवी लांडगे व त्यांचे कुटुंबीय हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने निष्ठावान म्हणून ओळखले जाते. असे असताना महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर लांडगे कुटुंबातील रवी यांना पदांपासून डावलण्यात आले. त्यामुळे ते नाराज झाले होते. त्यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपचा राजीनामा दिला होता. दोन वर्षे वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
Khed: ज्येष्ठ नागरिकाला काठीने मारहाण, पाच जणांवरुद्ध गुन्हा दाखल
पक्ष प्रवेशासाठी मुंबईला जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना रवी लांडगे म्हणाले की, जनसंघापासून कुटुंबियांनी भाजपची प्रामाणिकपणे सेवा केली. परंतु, आमदार महेश लांडगे हे भाजपमध्ये आल्यापासून पक्षाचा विचार बाजूला ठेवला आहे. वेगळ्या पद्धतीची त्यांची कार्यपद्धत आहे. त्यांच्यामाध्यमातून भोसरीतील प्रत्येक कामात भ्रष्टाचार सुरु आहे. हुकुम, धडपशाही, सत्तेचा गैरवापर आणि लोकांना खोटी आश्वासने दिली जात आहेत. याला जनता कंटाळली असून भाजपचा प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता नाराज आहे. या चुकीच्या कार्यपद्धतीला कंटाळून आणि सहनशीलतेचा अंत झाल्याने भाजपचा समविचारी पक्ष असलेल्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. भोसरीत शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. उमेदवारी दिली तर मी नक्कीच विधानसभेची निवडणूक लढविणार आहे.