एमपीसी न्यूज : लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न (Lonavala) सोडविण्यासाठी शहरातील जुन्या महामार्गाच्या रुंदीकरणाची कार्यवाही नगरपालिकेने सुरू करावी. लोणावळा शहरात ओला-उबर सारख्या ऑनलाइन बुकिंगच्या रिक्षा व टॅक्सींना व्यवसायासाठी बंदी करण्यासह लोणावळा-खंडाळा शहरातील विविध विकासकामांबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आले.
या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेविका शादानभाभी चौधरी, मिलिंद भालेराव, विशाल मराठे, मुकेश परमार, जीवन गायकवाड, दिलीप गुप्ता, मंगेश आगरवाल, भरत हरपुडे, संदीप कोराड, वसंत काळोखे, दत्ता येवले, योगेश गवळी, आनंद सदावर्ते यांसह इतर स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीस गृहनिर्माण, नियोजन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग उर्जा व कामगार विभाग या विभागांचे अप्पर मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे सचिव, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी पुणे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांसह संबंधित विभागाचे सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
लोणावळा शहरात 16 ऑगस्टला झालेल्या संवाद बैठकीतील चर्चेनंतर अजितदादांनी दिलेल्या शब्दानुसार लोणावळा शहरातील विविध समस्यांचा आढावा मंत्रालयातील या बैठकीत घेण्यात आला.
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या जाणून घेत जुना मुंबई-पुणे महामार्ग (Lonavala) रुंदीकरणाच्या कामासाठी नगरपरिषदेकडून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
ऑनलाईन बुकिंगची सुविधा असलेल्या ओला, उबर आदी कंपन्यांच्या रिक्षा व टॅक्सींना लोणावळा-खंडाळा शहरामध्ये व्यवसाय करण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली. त्याबाबतचे निर्देश अजितदादांनी दिले. यामुळे शहरातील स्थानिक रिक्षा व टॅक्सीचालकांना मोठा दिलासा मिळणार असून अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश मिळाले आहे.
Chikhali :मोई-चिखली रोडवर हिट अँड रन
शहरातील भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी भूसंपादनाकरीता वित्त विभागाकडून सुमारे 15 कोटी निधी उपलब्ध करुन देणार असुन जोडरस्त्याचे काम देखील तातडीने करण्याबाबतचे निर्देश संबंधितांना दिले.
लोणावळा-खंडाळा परिसरात लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. या पर्यटकांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर मध्यतंरी कारवाई करण्यात आली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेनंतर भुशी डॅम परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश अजितदादांनी (Lonavala) जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
इंदिरा वसाहतीकडे जाणारा रस्ता करण्यास पोलीस विभागाकडून परवानगी देऊन तात्काळ रस्ता करण्याचे आदेश देण्यात आले.
नगरपरिषद हद्दीतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेत पाण्याच्या टाकीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश संबंधित विभागास देण्यात आले आहेत.
लोणावळा नगरपरिषदेत अनुकंपा तत्त्वावरील नोकरी उपलब्ध होण्यासाठी मुंबई येथे सादर केलेल्या प्रस्तावातील कागदपत्रांची पुढील आठ दिवसात छाननी करुन तात्काळ अनुकंपावरील बांधवांना नोकरीची संधी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले.
लोणावळा शहरातील सांडपाणी समस्या सोडविण्यासाठी पीएमआरडीए मार्फत एकूण नऊ ठिकाणी STP प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या परवानगीसाठी पाठविण्यात आलेला आहे. त्या प्रस्तावास मंजुरी मिळण्यासाठी (Lonavala) संबंधितांना निर्देश दिले असून सदर कामास गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या महत्वपूर्ण विषयांसोबत शहरातील विकासासंदर्भातील व स्थानिक अडचणींचा आढावा अजित पवार यांनी घेतला असून सदर प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासनास कठोर निर्देश देण्यात आले.