एमपीसी न्यूज – वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना हिंजवडी (Hinjawadi) पोलिसांनी अटक केली. हे चोरटे लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे चोरीची दुचाकी घेऊन आले असता पोलिसांनी त्यांना सापळा लावून ताब्यात घेतले. ती कारवाई बुधवारी (दि. 21) करण्यात आली.
अक्षय बाबूलाल राकावत (वय 28), मदनलाल छोटूराम देवासी (दोघे रा. जांबे, ता, मुळशी. मूळ रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील जांबे गावात भारत सोपान जाधव (वय 53, रा. वाकड) यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14/एचएफ 5909) पार्क केली होती. भर दिवसा त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार 19 ऑगस्ट रोजी उघडकीस आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली की, लक्ष्मी चौक हिंजवडी येथे दोघेजण चोरीची दुचाकी घेऊन येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अक्षय आणि मदनलाल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता ती दुचाकी त्यांनी जांबे गावातून चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडे आणखी चौकशी करत पोलिसांनी चार दुचाकी आणि एक रिक्षा जप्त केली.
Pune : डिजिटल पोर्ट्रेट आर्टिस्ट प्रणव सातभाईच्या पोर्ट्रेटचे बालगंधर्वमध्ये प्रदर्शन
या कारवाईमुळे हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, हडपसर आणि पौड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस (Hinjawadi) आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक बंडू मारणे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापूसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, ओमप्रकाश कांबळे, मंगेश लोखंडे यांनी केली.