एमपीसी न्यूज – भारतीयांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने जेव्हा (Pune )जेव्हा भारताला विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रास मदत करण्यासाठी नकार दिला; तेव्हा भारतीय शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांनी जिद्दीने तंत्रज्ञान विकसित केले. यामध्ये हरित क्रांती पासून ते अगदी अलीकडे कमी खर्चात यशस्वी केलेली मंगलयान मोहीम यांचा समावेश होतो. भारताला कुठल्याही क्षेत्रात नाकारल्यास, भारत पुढील काही काळात त्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च स्थान मिळविल्या खेरीज स्वस्थ बसत नाही, असे मत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’ पुणे (आयसर) संचालक डॉ. सुनील भागवत यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पीसीसीओई निगडी येथे आठवी ‘आयसीसीयुबीईए – २४’ आणि तिसरी ‘आयमेस – 24’ या अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित दोन अंतरराष्ट्रीय परिषदांचे उद्घाटन शुक्रवारी (दि .23) डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयआयआयटी नयारायपूरचे उप-कुलगुरू आणि संचालक डॉ. प्रदीप कुमार सिन्हा, आयईईई पुणे विभाग उपाध्यक्ष डॉ. अमोल बुचडे, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ.नीळकंठ चोपडे, ‘आयसीसीयुबीईए – 24 प्रमुख डॉ. रोशनी राऊत, ‘आयमेस – 24 प्रमुख डॉ. प्रवीण काळे आदी उपस्थित होते.
यावेळी ‘सोव्हेनिअर 24 या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या परिषदेसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुमारे बाराशे प्रवेशिका आल्या. त्यामधून 217 संशोधन पत्रिका सादर करण्यात आल्या.
नवीन संशोधकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य आयईईई करत आहे. जग झपाट्याने बदलत असून यामध्ये आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित केली जात आहे. त्यामुळे जगभरातील वैज्ञानिक, तंत्रज्ञ सर्व समावेशक हायब्रीड तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत आहेत. भारत या क्षेत्रात आघाडीवर आहे असे डॉ. प्रदीप कुमार सिन्हा यांनी सांगितले.
Supriya Sule : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ भर पावसात सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना केले मार्गदर्शन
डॉ. अमोल बुचडे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रवीण काळे, डॉ. रोशनी राऊत यांनी तर डॉ. दिप्ती खुरगे यांनी आभार मानले. यावेळी विविध विद्याशाखेचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी परिषदेसाठी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.