एमपीसी न्यूज – पं. गजाननबुवा जोशी, पं बबनराव हळदणकर, (Pune)डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, पं रामाश्रय झा या बुजुर्ग बंदिशकारांच्या बंदिशींचे सादरीकरण पुणेकर रसिकांनी अनुभविले. निमीत्त होते जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या प्रेरणा संगीत संस्थेच्या वतीने आयोजित ‘कल्याण थाट के राग’ या कार्यक्रमाचे. नवी पेठ येथील एस एम जोशी सभागृह येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात रसिक प्रेक्षकांनी कल्याण थाटातील रागांचे गायन- वादन तर उत्तरार्धात ‘तालगजर’ हा कार्यक्रम अनुभवला
प्रेरणा संगीत संस्थेचे विश्वस्त नितीन महाबळेश्वरकर, डॉ सुचित्रा कुलकर्णी यांसोबतच आप्पा पाटणकर, चंद्रशेखर सेठ, पं. उमेश मोघे हे मान्यवर यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.
विदुषी सानिया पाटणकर व त्यांच्या शिष्या वेदवती परांजपे, डॉ. प्रीती बर्वे, ईश्वरी श्रीगार, आदिती नगरकर यांनी कल्याण थाटातील रात्रीच्या व सकाळच्या रागांचे बहारदार सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी बुजुर्ग बंदिशकारांच्या बंदिशी सादर केल्या. कल्याण पंचक ची रागमाला प्रस्तुत केली ज्यामध्ये राग कामोद, केदार, हमीर, गौडसारंग, छायानट या पाच रागांचा समावेश होता. यासोबतच त्यांनी राग नंदमध्ये सरगम गीत, हिंडोल रागात तराणा, शाम कल्याण रागामधील बंदिशी, शुद्ध कल्याण रागात मत्तताल व अडाचौताल मधील बंदिशींचे सादरीकरण केले. यावेळी महेशराज साळुंके (तबला), माधव लिमये (संवादिनी) तर रुची शिरसे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
Pune : विज्ञान-तंत्रज्ञान आत्मसात करण्यात भारतीय अग्रेसर – डॉ. सुनील भागवत
त्यानंतर पं. रूपक कुलकर्णी यांनी राग कल्याण थाटात मारूबिहागची प्रस्तुती करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी झपतालचे सादरीकरण केले. त्यांना कलकत्ता येथील पं. अभिजीत बॅनर्जी यांनी तबलासाथ केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये ‘तालगजर’ हा अतिशय नाविन्यपूर्ण असा 25 तबला आणि पखवाज वादन यांचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वयाने लहान असलेल्या वादकांनी आपल्या वादनाने प्रेक्षकांची मने जिंकली. महेशराज साळुंके, उमेशराज साळुंके व दीपक दसवडकर यांच्या शिष्यवर्गाने सदर कार्यक्रमाचे सादरीकरण केले होते. गौरी जोशी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.