एमपीसी न्यूज – एक तरुण मागील काही (Hinjawadi) महिन्यांपूर्वी घरच्यांसोबत भांडण झाले म्हणून रागाने सातारा येथून पुणे शहरात आला आणि मोठा उपद्व्याप केला. युट्युबवर त्याने वाहन चोरी कशी करायची, याचे व्हिडीओ पाहिले. त्यातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे त्याने एक ना दोन तब्बल 18 दुचाकी चोरल्या. अखेर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने त्याला बेड्या ठोकल्या.
अभिषेक मल्लाप्पा हावळेकर (वय 21, रा. आंबेठाण, चाकण. ता. खेड. पुणे. मूळ रा. साई दर्शन कॉलनी, शाहूपुरी, सातारा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 ऑगस्ट रोजी एकाच सोसायटी मधून दोन दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट चारची तीन पथके तयार करण्यात आली. वाहन चोरी करणारे आरोपी कोणत्या मार्गाने आले आणि गेले याची पाहणी करताना तिन्ही पथकांनी सुमारे 80 सीसीटीव्ही फुटेज तपासले.
Pune : पुणे येथील वस्तू व सेवा कर (GST) भवनच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
त्या तपासात दोघांनी मिळून ही वाहने चोरी केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यातील एकाची ओळख पटवून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करत त्याचा साथीदार अभिषेक हावळेकर याला 20 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे सांगितले.
काही महिन्यांत 18 दुचाकी चोरल्या
अभिषेक हावळेकर याने मागील काही महिन्यात हिंजवडी मधून सहा, वाकड, सांगवी, पिंपरी, चिंचवड मधून प्रत्येकी एक, चतुश्रुंगी मधून तीन, चंदननगर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक आणि सातारा शहर येथून एक दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. आणखी दोन दुचाकींच्या मालकांबाबत पोलीस तपास करीत आहेत. या कारवाई मुळे 16 गुन्हे उघकीस आले आहेत.
वाहन चोरीचे युट्युबवर घेतले प्रशिक्षण
आरोपी अभिषेक हा मुळचा सातारा येथील आहे. त्याचे मागील काही महिन्यांपूर्वी घरच्यांशी भांडण झाले. त्यामुळे तो घरातून रागाने पुण्याला निघून आला. त्यानंतर त्याने झटपट पैसे कमावण्यासाठी वाहन चोरी करण्याचा विचार केला. वाहन चोरी कशी करावी, याबाबत त्याने युट्युबवर व्हिडीओ पाहिले. तसेच तो शक्यतो महामार्गालगत पार्क केलेल्या दुचाकी चोरी करत असे. कारण, महामार्गालगत सीसीटीव्ही कॅमेरे कमी असतात. आपण चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येणार नाही, यासाठी तो ही खबरदारी घेत असे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश दळवी, नारायण जाधव, सहायक फौजदार संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, पोलीस अंमलदार प्रवीण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, रोहिदास आडे, वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, अमर राणे यांनी केली.