एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील महत्वाच्या चार कामांची निविदा (Maval)प्रक्रिया 30 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर या कामांना गती मिळाली आहे. राज्य शासनाने सुदुंबरेसाठी 15 तर टायगर लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्काय वॉकसाठी 10 कोटींचा निधी वितरीत करण्यात येत असल्याचा शासन निर्णय जारी केला आहे.
लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्कायवॉक या कामासाठी सुमारे 333 कोटी 56 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्कायवॉक महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास इथल्या पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे. त्यामुळे लोणावळा येथून लायन्स व टायगर पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गाचे देखील रुंदीकरण केले जाणार आहे.
ग्लास स्कायवॉक लायन्स व टायगर पॉईंटला जोडणारा 120 मीटर लांब व सहा मीटर रुंद असेल. लायन्स व टायगर पॉईंट यांना जोडणाऱ्या दरीवर पूल, झिप लाईन, बंजी जम्पिंग, वॉल क्लायम्बिंग यांसारखे साहसी खेळ, एम्फी थिएटर, फूड पार्क, वाहनतळ, प्रकाश व ध्वनी शो आणि इतर पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.
Pimpri : कंगनाचा भाजपने राजीनामा घ्यावा – काशिनाथ नखाते
या कामासाठी टप्प्याटप्प्यात निधी वितरीत केला जात आहे. सल्लागार शुल्कापोटी पाच कोटी तर आकस्मिक निधी म्हणून पाच कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे संत जगनाडे महाराज यांची समाधी आहे. या समाधीचा विकास करण्यात येत आहे. त्यासाठी जमिनीचे संपादन करणे, इमारत बांधकाम आणि भाविकांना इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील भूसंपादनाच्या कामासाठी राज्य शासनाने 15 कोटींचा निधी वितरीत केला आहे. याबाबतचा देखील शासन निर्णय राज्याच्या नियोजन विभागाने जारी केला आहे.