एमपीसीन्यूज – बलात्काराची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला जोधपूर येथून पुण्यात आणण्यात आले आहे.तब्बल 11 वर्षांनी(Pune) आसाराम बापू तुरुंगाबाहेर आला आहे.आसाराम बापूला इंदूरमधील एका आश्रमामधून जोधपूर पोलिसांनी 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. पाच वर्षे चाललेल्या खटल्यानंतर 2018 मध्ये आसाराम बापूला जन्मठेशी ठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
गुजरात मधील गांधीनगर येथील आश्रमातील आणखी एका महिलेने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. या केसचा निकाल 2023 मध्ये गांधीनगर कोर्टाने दिला. त्यामध्ये देखील त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तब्बल अकरा वर्षांपासून आसाराम बापू तुरुंगात आहे. राज्यस्थान उच्च न्यायालयाने शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला दिलासा देत आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. वैद्यकीय कारणासाठी आसाराम बापूला सात दिवसांचा पॅरोल कोर्टाने मंजूर केला आहे.
आसाराम बापूला गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराचा त्रास सुरू असून त्यावर आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. यासाठी आसाराम बापूला जोधपूर मधून पुण्यात आणण्यात आले असून खोपोली येथील एका खासगी कॉटेजमध्ये ठेवण्यात आले असून उपचारही सुरू करण्यात आले आहेत.
चोवीस तास पोलिस बंदोबस्तात बापूवर उपचार करण्यात येणार आहे . या उपचाराचा आणि प्रवासाचा सर्व खर्च आसारामला करायचा आहे. आसारामला उपचारासाठी पुण्यात आणल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पुणे पोलिसांकडून कोर्टाला सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतरही आसारामला पुण्यात उपचार घेण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे.
कोर्टाने परवानगी देताना काही अटी घातल्या आहेत. यामध्ये त्याच्यासोबत चार पोलीस कर्मचारी प्रवासात सोबत असतील, तसेच आसारामला उपचारादरम्यान सोबत दोन अटेंडंट ठेवण्याची मुभाही देण्यात आली आहे. उपचारादरम्यान त्याला एका खाजगी कॉटेजमध्ये ठेवण्यात येणार असून त्या ठिकाणीच त्याचा उपचार करण्यात येणार आहे. या उपचारासाठी व वाहतुकीसाठी आणि पोलीस बंदोबस्त साठी येणारा संपूर्ण खर्च आसारामला करावा लागणार असल्याचे कोर्टाने सांगितले आहे.