एमपीसी न्यूज – निधी अभावी प्रलंबित असलेली देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (Dehuroad) हद्दीतील कामे केंद्र व राज्य शासन तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) दिली.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विविध विकासकामे व समस्या याबाबत आढावा घेण्यासाठी खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी बारणे बोलत होते. बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर अमन कटोच, मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत, सदस्य प्रशासक कैलास पानसरे, कार्यालय अधीक्षक लक्ष्मण तनपुरे, अभियंता टोनी अँथनी, गिरीधर शर्मा, राजस्व विभागाचे सुनील गुरव, भांडार प्रमुख वीरेंद्र घोडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, युवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, शिवसेना शहरप्रमुख नीलेश तरस, शिवसेना देहूगाव शहरप्रमुख सुनील हगवणे, देहूरोड शहरप्रमुख दीपक चौघुले तसेच संजय पिंजण, विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, प्रवीण झेंडे, सागर लांगे व देहूरोडचे नागरिक उपस्थित होते.
देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याच्या प्रस्तावात सुरुवातीला (Dehuroad) देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचाही समावेश होता, मात्र संरक्षण विभागाच्या दृष्ट्या महत्त्वाचे असल्यामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त न करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगातून कॅन्टोन्मेंट बोर्डांना निधी मिळत असे, मात्र निधी अभावी अनेक कामे प्रलंबित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
Pimpri : शहरात डेंग्यूचे 122, चिकनगुनिया 22, झिकाचे 6 रुग्ण
जिल्हा नियोजन व विकास समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून आपण स्वतः तसेच आमदार सुनील शेळके मिळून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला राज्य शासनाचा निधी उपलब्ध करून देऊ. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांशी चर्चा करून महापालिकेच्या माध्यमातून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील काही कामे करता येतील का, याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे बारणे यांनी सांगितले.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून संत तुकाराम महाराज पालखी जाते. हा पालखी मार्ग विकसित करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. काळोखे मळ्याकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची दूरवस्था झाल्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीलगत असलेल्या सिद्धिविनायक नगरीतील पाणी, रस्ते व ड्रेनेजच्या कामांसाठी डीपीडीसीतून निधी मिळवून देण्यात यावा. पिंपरी-चिंचवड महापालिकेने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत विद्युतदाहिनीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या ठिकाणी नागरिकांना अधिक सुविधा देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत काही ठिकाणी सांडपाणी पवना नदीत जाऊन मिळत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे सहकार्याची मागणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. देहूरोड मधील स्वच्छता, डेंग्यूचे रुग्ण यासह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
youtube.com/watch?v=IOYZxQkal4M