पुणे: भाजपने शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर केली. २२ जणांच्या या यादीत पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपसाठी कसबा मतदारसंघ हा डोकेदुखी ठरला आहे. आता उमेदवारी जाहीर केल्यानंतर देखील पक्षाला विजयाची खात्री मिळेल याची खात्री दिसत नाही.
कसबा पेठ येथून कोणाला उमेदवारी द्यायची यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्या विरुद्ध हेमंत रासने यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यावेळी पक्षाकडून उमेदवार बदलला जाईल अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात पक्षाने रासने यांच्यावर विश्वास दाखवला. निवडणुकांची घोषणा झाल्यावर सकल ब्राह्मण समाजाने या मतदारसंघातून ब्राह्मण उमेदवार देण्याची मागणी केली होती. पोटनिवडणुकीत ब्राह्मण उमेदवार न दिल्याचा फटका बसल्याचे म्हटले जात होते.
नितेश राणे स्वत:च्या भावाला पक्षात ठेवून न्याय देऊ शकले नाहीत; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा जोरदार निशाणा
आता रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपली भावना व्यक्त केली आहे. घाटे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला हिंदूत्ववादी सरकार हवंय, पण ३० वर्ष हिंदूत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय…
BJP Second List: भाजपची दुसरी यादी जाहीर, २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा; पाहा कोणाला संधी मिळाली
कसबा पेठ मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी धीरज घाटे आग्रही होते. परंतु त्यांच्या ऐवजी पक्षाने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर घाटे यांनी ही पोस्ट केली आहे. याबाबत घाटे यांच्याशी संपर्क साधला असता, मी माझ्या भावना या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. हीच माझी भूमिका आहे, येत्या काही दिवसात भूमिका स्पष्ट करेन, असे सांगितले.
स्रोत : महाराष्ट्र टाईम्स