SLA vs AFGA Asia Cup Final : अफगाणिस्तान श्रीलंकेचा धुव्वा उडवत आशिया चॅम्पियन, अंतिम सामन्यात 7 विकेट्सने विजयी
Sri Lanka A vs Afghanistan A Final Match Result : अफगाणिस्तानने उद्योनमुख आशिया कप ट्रॉफी जिंकत इतिहास घडवला आहे. अफगाणिस्तानने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे.
अफगाणिस्तान ए टीमने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एमर्जिंग आशिया कप 2024 च्या अंतिम सामन्यात अफगाणिस्तान ए टीमने श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. श्रीलंकेने विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं होतं. अफगाणिस्तानने हे आव्हान 3 विकेट्स गमावून आणि 11 बॉल राखून पूर्ण केलं. अफगाणिस्तानने 18.1 ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण केलं. सेदीकुल्लाह अटल आणि मोहम्मद इशाक या जोडीने हा विजय मिळवून दिला. तर कॅप्टन दारविश रसूली आणि करीम जनात या दोघांनीही विजयात योगदान दिलं. या विजयानंतर संघात आणि अफगाणिस्तानाच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे.
अफगाणिस्तानची विजयी धावांचा पाठलाग कराताना निराशाजनक सुरुवात झाली. अफगाणिस्तानने पहिल्याच बॉलवर विकेट गमावली.
झुबैद अकबरी आला तसाच गेला. त्यानंतर सेदीकुल्ला अटल आणि कॅप्टन दारविश रसून या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दारविश हा 24 धावा करुन आऊट झाला. अनुभवी करीम जनात आणि सेदीकुल्ला या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 52 धावा जोडल्या. करीन जनात यानंतर 33 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे अफगाणिस्तानची स्थिती 15 ओव्हरमध्ये 3 बाद 95 अशी झाली होती.
त्यानंतर अवघ्या 19 बॉलमध्ये सेदीकुल्ला आणि मोहम्मद इशाक या जोडीने अफगाणिस्तानला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी फटकेबाजी करत हे आव्हान पूर्ण केलं. सेदीकुल्लाने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. सेदीकुल्लाने 55 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या. तर मोहम्मद इशाक याने 6 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 16 रन्स केल्या. तर श्रीलंककेडून इशान मलिंगा, दुशान हेमंथा आणि सहान अरचिगे या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
अफगाणिस्तान ए आशिया चॅम्पियन
स्रोत: टी वी9 मराठी