WIND vs WNZ : राधा यादवची झुंज व्यर्थ, टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात पराभूत, न्यूझीलंड 76 धावांनी विजयी
India Women vs New Zealand Women 2nd ODI Match Result : टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर होती. त्यामुळे महिला ब्रिगेडकडे दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी होती. मात्र न्यूझीलंडने कमबॅक करत सीरिज बरोबरीत सोडवली आहे.
विश्व विजेत्या न्यूझीलंड वूमन्सने टीम इंडियावर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 76 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज अपेक्षित सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मात्र त्यानंतर राधा यादव आणि सायमा ठाकोर या दोघांनी नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करत पराभवातील अंतर कमी केलं आणि लाजीरवाणा पराभव टाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. न्यूझीलंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना हा निर्णायक आणि चुरशीचा होणार आहे.
टीम इंडियाची बॅटिंग
स्मृती मंधाना 0, शफाली वर्मा 11, यास्तिका भाटीया 12, जेमिमाह रॉड्रिग्ज 17, कॅप्टन हरमनप्रीत कौर 24, तेजल हसबनीस 15, दीप्ती शर्मा 15 आणि अरुंधती रेड्डी 2 धावा करुन बाद झाल्या. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 26.6 ओव्हरमध्ये 8 बाद 108 अशी झाली होती. मात्र त्यानंतर राधा यादव आणि साईमा ठाकोर या दोघींनी नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. या दोघीमुळे टीम इंडियाची विजयाची आशा कायम होती. तसेच न्यूझीलंडही काही वेळ अडचणीत सापडली होती. मात्र साईमा ठाकोर आऊट झाल्याने नववी विकेट गेली आणि विजयाच्या आशा मावळल्या.
साईमाने 29 धावाचं योगदान दिलं. त्यानंतर राधा यादव आऊट झाली आणि टीम इंडियाचा डाव हा 47.1 षटकांमध्ये 183 धावांवर आटोपला. राधा यादव हीने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. राधाने 64 चेंडूत 5 चौकारांसह 48 धावा केल्या. मात्र आधीच्या फलंदाजांनी जबाबदारी बॅटिंग न केल्याने टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडकडून ली ताहुहू आणि कॅप्टन सोफी डेव्हाईन या दोघींनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर जेस केर आणि ईडन कार्सन या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
न्यूझीलंडची बॅटिंग
त्याआधी न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 259 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी कॅप्टन सोफी डेव्हाईन हीने सर्वाधिक 79 तर सुझी बेट्सने 58 धावांचं योगदान दिलं. तर टीम इंडियासाठी राधा यादव हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच राधाने 2 अप्रतिम कॅच घेतल्या. राधाने अष्टपैलू कामगिरी केली. मात्र इतर खेळांडूकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
न्यूझीलंडकडून मालिकेत 1-1 ने बरोबरी
स्रोत: टी वी9 मराठी