Mishtann Foods Share Price : मिष्टान्न फूड्स लिमिटेड या कंपनीचा तिमाही निकाल चांगला लागला असून त्यामुळं शेअरमध्ये तेजी आली आहे.
Penny Stock : अवघ्या २.२१ रुपयांच्या शेअरने तीन वर्षांत सुमारे १५ रुपयांवर झेप घेतली. आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीतील कंपनीच्या भक्कम आर्थिक कामगिरीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आज या चिटुकल्या शेअरमध्ये ६ टक्क्यांची वाढ झाली.
१४ मे २०२१ रोजी मिष्टान्न फूड्सचा शेअर २.२१ रुपये होता, जो आज १४.८८ रुपयांवर पोहोचला. या साडेतीन वर्षांच्या कालावधीत या शेअरने ९ पटीहून अधिक परतावा दिला आहे. ५२ आठवड्यांतील उच्चांकी २५.३६ रुपये आणि नीचांकी स्तर ११.९३ रुपये आहे. आज, सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये हा शेअर जवळपास ६ टक्क्यांनी वधारला. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तो १.१४ टक्क्यांनी वधारून १४.२३ रुपयांवर ट्रेड करत होता.
मिष्टान्न फूड्सचा एकत्रित निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत २१.८९ टक्क्यांनी वाढून १०६.५७ कोटी रुपये झाला आहे. या तिमाहीत विक्री ३४१.८८ कोटी रुपये झाली आहे, जी आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीतील ३१८.४० कोटी रुपयांच्या तुलनेत ७.३७ टक्क्यांनी अधिक आहे.
एबिटडा वार्षिक आधारावर २० टक्क्यांनी वाढून ९०.५४ कोटी रुपयांवरून १०८.३६ कोटी रुपयांवर पोहोचला. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत मिष्टान्न फूड्सचा निव्वळ नफा ७.७ टक्क्यांनी वाढून १०८ कोटी रुपये झाला आहे, जो आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत १००.२२ कोटी रुपये होता. कंपनीचे एकूण उत्पन्न १८.३ टक्क्यांनी वाढून ७२४.५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत ६१२.३५ कोटी रुपये होते.
काय करते ही कंपनी?
भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेली मिष्टान्न फूड्स ही कंपनी आपल्या बासमती तांदळाच्या वाणांसाठी आणि डाळी, गहू आणि मसाल्यांसह इतर कृषी उत्पादनांसाठी ओळखली जाते. कंपनीचा तांदूळ प्रक्रिया प्रकल्प अहमदाबाद आणि गुजरातमधील बंदराजवळ आहे. त्यावर वर्षाकाठी एक लाख मेट्रिक टन प्रक्रिया केली जाते. मिष्टान्नच्या बासमती तांदळाच्या रेंजमध्ये कच्च्या, सेला आणि स्टीम व्हेरियंटचा समावेश आहे. हे देश-विदेशातील ग्राहकांच्या एका मोठ्या वर्गाला आकर्षित करते. कंपनी सैंधव मीठ आणि गुलाबी मीठ यासह खाद्य मीठाच्या उत्पादनांची देखील विक्री करते.
स्रोत: हिंदुस्थान टाइम्स