MS Dhoni on Share market : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानं तरुणांना शेअर बाजारातील फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
क्रिकेटइतकीच सध्या तरुणाईमध्ये शेअर मार्केटची क्रेझ आहे. नव्यानं शेअर मार्केटमध्ये येणारे तरुण झडपट पैसे कमावण्याच्या आशेनं मोठ्या प्रमाणावर फ्युचर्स अँड ऑप्शन्सचा पर्याय हाताळत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं या उत्साही तरुणांना भानावर आणण्याचं काम केलं आहे. त्यानं तरुणांना ‘एफ अँड ओ’ (फ्युचर अँड ऑप्शन) पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
तो एका मुलाखतीत बोलत होता. ज्यांच्या दाढीचे केस पांढरे झाले आहेत, त्यांना आपण काय करतो आहोत याची पूर्ण कल्पना असते. सर्व व्यावसायिक ट्रेडर्स ट्रेडिंग करत असतात. मात्र तरुणांनी यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये, यातून बाहेर पडणं अवघड होईल, असं धोनी म्हणाला. ‘आयुष्यात जोखीम पत्करायला हवी. मात्र ज्याचा भार आपण सहन करू शकत नाही अशा जोखमीपासून आपण दूर राहायला हवं, असं तो म्हणाला.
‘ज्यांना आयुष्यात काहीतरी थ्रील हवं आहे, त्यांनी काहीतरी वेगळं करावं. मी ५००० टाकून बघतो काय होतं ते, अशा पद्धतीनं ट्रेडिंग करणं ही योग्य पद्धत नाही. हे तुमचं काम नाही. प्रोफेशनल लोकच ते हाताळू शकतात, असं धोनी यानं सांगितलं.
स्रोत: हिंदुस्थान टाइम्स