Nawab Malik Mankhurd Shivaji Nagar Assembly constituency : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे मानखुर्द – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यांच्या उमेदवारीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अनुशक्तीनगर या मलिकांच्या मतदारसंघातून त्यांची लेक सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. तर नवाब मलिकांनी याच मतदारसंघाच्या बाजूला असलेल्या मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये जोरदार प्रचार सुरू केला आहे. मात्र, त्यांचा पक्ष कोणता असेल ते त्यांनी अजूनही जाहीर केलेलं नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर नवाब मलिक कोणत्याही गटात गेलेले नाहीत. त्यांची अजित पवार गटाबरोबर जवळीक आहे. त्यांची मुलगी याच पक्षात आहे. मात्र नवाब मलिकांना महायुतीतील इतर मित्रपक्षांनी विरोध केला आहे. प्रामुख्याने भाजपाचा मलिकांना विरोध आहे. त्यामुळे नवाब मलिक हे अपक्ष निवडणूक लढवू शकतात.
दरम्यान, आज (२८ ऑक्टोबर) सना मलिक यांचा उमेदवारी अर्ज भरताना नवाब मलिक त्यांच्याबरोबर उपस्थित होते. त्यानंतर नवाब मलिकांनी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “गेली पाच वर्षे माझ्या मुलीनेच अणूशक्तीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये काम केलं आहे. तिला येथून निवडणूक लढवण्यास सांगण्याबद्दल मी आधीच निर्णय घेतला होता. दुसऱ्या बाजूला, मानखुर्द शिवाजीनगरमधील जनतेचा आग्रह होता की मी येथून विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे. आज माझी लेक सना मलिक हिचा विधानसभा निवडणुकीसाठीचा अर्ज आम्ही दाखल केला आहे. उद्या मी माझा अर्ज दाखल करेन”.
नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, नवाब मलिक नेमक्या कोणत्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट नाही. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, मी उद्या माझा उमेदवारी अर्ज दाखल करेन. तेव्हा तुम्हाला कळेल की मी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतोय. मी अपक्ष निवडणूक लढवतोय की इतर कुठल्या पक्षाबरोबर असेन ते उद्या सर्वांसमोर स्पष्ट होऊ शकेल. मी आणि माझी मुलगी आम्ही दोघे विधानसभेत जाणार आहोत. पाच वेळा अणूशक्तीनगरमधून आमदार होऊन मी विधानसभेवर गेलो आहे. आता सहाव्यांदा जाणार आहे. माझी लेक सनाची ही पहिलीच वेळ आहे. ती देखील निवडून येईल. त्यामुळे निश्चितच राज्यात एक वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल.
स्रोत : लोकसत्ता