Ranji Trophy 2024 Bihar Cricket Board Desi Jugad Photo Viral : पाटणाचे मोईनुल हक स्टेडियम आणि बिहार क्रिकेट बोर्ड गैरव्यवस्थापनासाठी कुप्रसिद्ध आहे, हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या स्टेडियममध्ये कर्नाटक आणि बिहार यांच्यात रणजी ट्रॉफी सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान पाऊस पडल्यानंतर खेळपट्टी कोरडी कऱण्यासा बिहार बोर्डाकडे कोणतीही व्यवस्था नव्हती. यावेळी कर्मचाऱ्यांनी खेळपट्टी कोरडी कोरण्यासाठी चक्क ‘देसी जुगाडा’ म्हणून शेणाच्या गवऱ्या जाळण्याचा प्रताप केला. मात्र, त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता बीसीसीआयवर सोशल मीडियावर टीका केली जात आहे.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाकडे हीटरही नाही –
जागतिक क्रिकेट चालवणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर जोरदार टीका होत आहे. खेळाडू आणि कोचिंग स्टाफला कोट्यवधी रुपये मानधन देणाऱ्या मंडळाकडे राज्याच्या स्टेडियमच्या देखभालीवर खर्च करण्यासाठी पुरेसा पैसा नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाटण्यातील मशहूद मोइनुल हक स्टेडियमची खेळपट्टी शेणाच्या गवऱ्या जाळून सुकवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्याचा फोटो व्हायरल होत आहे. काही कर्मचारी खेळपट्टीजवळ उभे राहून आपल्या ‘देसी जुगाडा’ची कमाल पाहत असल्याचे फोटोत दिसत आहे.
जीर्ण भिंती, ड्रेनेज व्यवस्था शून्य, बिहार क्रिकेट मंडळात काय चालले आहे?
हा फोटो २७ ऑक्टोबर म्हणजेच कालचा असल्याचा दावा केला जात आहे. खेळपट्टी ओली असल्याने लंचपर्यंत सामना सुरू होऊ शकला नसल्याचा दावाही केला जात आहे. यानंतर दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेणे भाग पडले. यापूर्वी या स्टेडियमच्या जीर्ण भिंती, इमारती आणि प्रेक्षक गॅलरीचे फोटोही समोर आले होते, त्यानंतर बिहार क्रिकेट बोर्डाने लवकरच दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले होते. तथापि, ड्रेनेज सिस्टम सोडा, खेळपट्टी कोरडी करण्यासाठी बोर्डाकडे हिटरही नाही.
बिहार विरुद्ध कर्नाटक सामन्यात आतापर्यंत काय घडले?
रणजी ट्रॉफी २०२४-२५ मधील सामन्यात बिहारने कर्नाटकविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १४३ धावा केल्या होत्या. बिहासाठी सलामीवीर शर्मन निग्रोधने १४३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ६० धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय बिपीन सौरभ ३१, आर. प्रताप सिंग १६ आणि एस. घनीने १३ धावांची खेळी केली होती. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. कर्नाटक संघाकडून श्रेयस गोपालने सर्वाधिख चार विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहसिन खानने ३ विकेट्स घेतल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्नाटकने ७ बाद २८७ धावा करत पहिल्या डावात १४४ धावांची आघाडी घेतली आहे.
स्रोत : लोकसत्ता