सितराज परब-प्रतिनीधी, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील नागवे या लहानशा गावात सत्यवान कुडाळकर यांच्या घरात मातीचा कुंभारकामाचा व्यवसाय पिढ्यान् पिढ्या चालत आला आहे. सत्यवान हे या व्यवसायाचे तिसरे वारसदार आहेत. पिढीगत व्यवसायाची परंपरा जपत त्यांनी काळानुसार त्यात बदल घडवून आणले आहेत, पण त्यांचं मातीशी असलेलं प्रेम मात्र तेवढंच घट्ट राहिलंय.
कुंभारकाम म्हटलं की माती, आणि सत्यवान यांचा हात यात इतका सफाईदार आहे की त्यांनी गावभर आपल्या कुशलतेचं नाव कमावलं आहे. सत्यवान या व्यवसायासाठी माती गोवा आणि कर्नाटक येथून आणतात. ती माती आधी बारीक पावडर करून चाळली जाते, आणि त्यानंतर त्याचं योग्य प्रकारे मळून विविध वस्तू बनवल्या जातात. त्यांच्या हातून घडलेली मातीची जेवणाची भांडी, खेळणी, दिवे, आणि इतर गृहपयोगी वस्तू ग्राहकांच्या नजरेत भरण्यासारखी असतात.
हे तयार केलेलं भांडं काही दिवस उन्हात वाळवले जातात, ज्यामुळे त्याला मजबूतपणा मिळतो. या प्रक्रिया संपल्यानंतर वस्तूंना आकर्षक पॉलिश केलं जातं आणि त्या बाजारात विक्रीसाठी सज्ज होतात. सत्यवान सांगतात की, “आता सगळीकडे प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर वाढला असला तरी लोकांना मातीच्या वस्तूंची ओढ आहेच. त्यातून एक नैसर्गिक साधेपणा आणि पारंपरिक सौंदर्य लाभतं.”
आधुनिकतेच्या स्पर्धेत टिकून राहणं सोपं नाही, पण सत्यवान यांनी आपल्या व्यवसायाला काही प्रमाणात तंत्रज्ञानाची जोड देत ही कला जिवंत ठेवली आहे. त्यांच्या कुंभारकामाला परिसरातून मोठी मागणी आहे, ज्यामुळे त्यांना वर्षाला साधारणतः ९-१० लाखांचा आर्थिक लाभ होतो. या व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतानाही त्यांना या व्यवसायातलं कौशल्य जपण्याचा मनापासून आनंद आहे.
स्रोत: न्यूज 18 मराठी