Explore

Search
Close this search box.

Search

November 10, 2024 5:06 pm

MPC news

दिवाळीत देखील खव्याचे दर पडलेलेच, शेतकऱ्यांनी सांगितलं खरं कारण, भेसळयुक्त खव्यावर कारवाई होणार का?

जालना : दिवाळीनिमित्त राज्यातील सर्वच प्रमुख शहरामधील बाजार गजबजले आहेत. विविध वस्तू आणि साहित्याच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. जालना शहर हे इंग्रज काळापासून मोठे व्यापारी केंद्र राहिले आहे. आजही जालना शहरात अनेक लहान मोठे उद्योग आहेत. शहरातील जुना मोंढा परिसरात भरणारा खवा बाजार हा देखील अतिशय प्रसिद्ध आहे. जालना शहराच्या आसपासच्या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने शुद्ध खवा या बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात. शुद्ध खवा मिळत असल्याने शहर आणि आसपासच्या परिसरातील ग्राहक देखील मोठ्या संख्येने या बाजारात खवा खरेदीसाठी येत असतात. मात्र ऐन दिवाळीत खव्याचे दर पडलेले आहेत.

जालना शहरातील खवा बाजारामध्ये दिवाळीमुळे मोठ्या प्रमाणावर खवा विक्रीला आल्याचे पाहायला मिळालं. मात्र दिवाळी असताना देखील खव्याला अपेक्षित दर मिळत नसल्याचे देखील पाहायला मिळते. खवा बाजारात खव्याला गुणवत्तेनुसार 280 ते 350 रुपये असा दर मिळत आहे. मात्र दिवाळीमध्ये खव्याचा दर हा 400 ते 450 प्रति किलो पर्यंत जाईल असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. व्यापाऱ्यांनीही खव्याचा दर हा साडेचारशे ते पाचशे रुपये प्रति किलो पर्यंत जाईल अशी शक्यता वर्तवली होती. मात्र खवा बाजारात कुंथलगिरी येथून खवा येत असल्याने आणि हा खवा भेसळयुक्त असल्याने खव्याला कमी दर मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

जालना शहरात जुना मुंडा भागात खवा अत्यंत चांगला मिळतो. म्हणून आज दिवाळीनिमित्त खवा घ्यायला आलो होतो. अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद ग्राहकांचा आहे. साडेतीनशे रुपये प्रति किलो एवढा सध्याचा भाव आहे. दिवाळीमुळे भाव वाढला आहे अन्यथा खवा जास्त आल्यास भाव देखील कमी असतो. जालना शहरासह आसपासच्या भागातील नागरिक तसेच व्यापारी देखील इथून खवा घेऊन जातात, असं महसूल कॉलनी जालना येथील नागरिक सुरेश काळे यांनी सांगितलं.

सिंधी काळेगाव येथील शेतकरी भगवान पोर धने यांनी चार किलो खवा विक्रीसाठी आणला होता. त्यांच्या खव्याला 280 रुपये प्रति किलो असा दर मिळाला. कुंथलगिरी या ठिकाणाहून भेसळयुक्त खवा जालना शहरातील खवा बाजारात येत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचे भगवान पोरधने यांनी सांगितलं. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भेसळयुक्त खव्याला जालन्यातील खवा बाजारात प्रतिबंध करावा, अशी मागणी जालना शहरात खवा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे.

स्रोत: न्यूज 18 मराठी
जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर