पुणे : अजित पवार यांची महायुतीत एन्ट्री झाल्यापासून जागावाटपाची सगळी समीकरणे बदलून गेली आहे. वडगाव शेरीमधून विद्यमान आमदार म्हणून सुनील टिंगरे यांना तिकीट मिळाल्याने स्थानिक भाजप नेते, पुणे शहराचे माजी अध्यक्ष जगदीश मुळीक नाराज झाले. मुळीक यांचे कार्यकर्तेही तिकीट न मिळाल्याने प्रचंड आक्रमक झाले होते. कालपर्यंत आपण लढणारच असे मुळीक सांगत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोन आला आणि आक्रमक झालेले कार्यकर्ते क्षणात शांत झाले.
मुळीक यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी फडणवीस यांनी फोन केला. ते म्हणाले, मुळीक नेते आहेत. त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. ते शंभर टक्के निवडून आले असते. त्यांना आपल्याला विधान मंडळात पाहायचे आहे. त्यांची जबाबदारी मी घेतली आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यावर समर्थकांनी एकच जल्लोष केला. आपल्याला महायुतीचा धर्म पाळावा लागेल. त्यासाठी मुळीक यांना माघार घ्यावी लागली. त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य करून माघार घेण्याचा निर्णय घेतला, याकरिता मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही फडणवीस म्हणाले.
अजित पवार यांनी सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म दिल्याने जगदीश मुळीक नाराज झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जगदीश मुळीक यांनाही एबी फॉर्म देण्यात आला होता. तत्पूर्वी काही मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत बावनकुळे यांनी दिले होते. परंतु अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुळीक यांनी माघार घ्यावी, असे ठरले. अखेर महायुतीकडून सुनील टिंगरे अधिकृत उमेदवार असल्याने ते शरदचंद्र पवार पक्षाच्या बापूसाहेब पठारे यांना फाईट देतील.