नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये नाशिकमध्ये आता फिल्मी स्टाईल राडा पाहण्यास मिळाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी एका डमी उमेदवाराला पोलिसांच्या नाकासमोरून उमेदवाराला गायब केलं. या उमेदवाराला उचललं आणि पोलिसांच्या व्हॅनमध्येच घेऊन समीर भुजबळांनी ताफा पळवला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
नांदगाव मतदारसंघात सुहास कांदे यांच्याविरोधात सुहास कांदे नावाचा दुसरा उमेदवार उभा करण्यात आला आहे. नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारामुळे सुहास कांदे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
तर दुसरीकडे, अर्ज भरण्यासाठी आले असताना नांदगाव तहसील कार्यालयात सिनेस्टाईल थरार पाहण्यास मिळाला. सुहास बाबुराव कांदे याला पोलीस बंदोबस्तात अज्ञात स्थळी हलवलं आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनातून बाहेर पडतात समीर भुजबळ यांनी पोलिसांच्या गाडीत बसवून सुहास बाबुराव कांदेला ताब्यात घेतलं. समीर भुजबळ यांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनमध्ये बसून सुहास बाबुराव कांदेला समीर भुजबळ घेऊन गेले. समीर भुजबळ यांनी सुहास बाबुराव कांदे याला मांडीवर घेऊन तहसील कार्यालयातून ताफा पळवला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, छगन भुजबळ यांचे पुतणे असलेल्या समीर भुजबळ यांनी ही खेळी केली आहे. समीर भुजबळ यांच्याच माध्यमाततून नावात साधर्म्य असलेल्या सुहास कांदेंना नांदगावमध्ये अपक्ष म्हणून रिंगणात उतरवण्यात आलं आहे, असा आरोप शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी केला आहे.
सुहास कांदे आणि भुजबळांमध्ये असलेले वाद सर्वश्रुत आहेत. शिवसेनेने सुहास कांदे यांना नांदगावमधून तिकीट दिल्यानंतर समीर भुजबळ यांनी या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि अर्जही दाखल केला. यानंतर सुहास कांदे यांनीही छगन भुजबळ लढत असलेल्या येवला मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.