नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपली आहे. अनेक ठिकाणी सगळ्याच पक्षांच्या बंडखोरांनी अर्ज दाखल केले आहेत, तर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही आघाड्यांमध्ये असलेल्या मित्रपक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. नाशिकच्या नांदगावमध्ये तर वेगळाच प्रकार पाहायाल मिळाला आहे.
नांदगाव मतदारसंघात सुहास कांदे यांच्याविरोधात सुहास कांदे नावाचा दुसरा उमेदवार उभा करण्यात आला आहे. नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारामुळे सुहास कांदे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे असलेल्या समीर भुजबळ यांनी ही खेळी केली आहे. समीर भुजबळ यांच्याच माध्यमाततून नावात साधर्म्य असलेल्या सुहास कांदेंना नांदगावमध्ये अपक्ष म्हणून रिंगणात उतरवण्यात आलं आहे, असा आरोप शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी केला आहे.
सुहास बाबुराव कांदे असं नांदगावमधून अपक्ष निवडणूक अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचं नाव आहे. अपक्ष रिंगणात उतरलेले सुहास कांदे हे धाराशिवचे रहिवासी आहेत. नांदगावमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुहास कांदे यांना समीर भुजबळांच्या समर्थकांनी सुरक्षा कवच दिलं आहे.
कांदे-भुजबळ वाद
सुहास कांदे आणि भुजबळांमध्ये असलेले वाद सर्वश्रुत आहेत. शिवसेनेने सुहास कांदे यांना नांदगावमधून तिकीट दिल्यानंतर समीर भुजबळ यांनी या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि अर्जही दाखल केला. यानंतर सुहास कांदे यांनीही छगन भुजबळ लढत असलेल्या येवला मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जळगावमध्येही तोच पॅटर्न
दुसरीकडे जळगाव विधानसभा मतदारसंघातही एकाच नावाचे दोन-तीन उमेदवार देण्यात आले आहेत, त्यामुळे मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. भाजपने जळगावमधून सुरेश दामू भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे, त्यांच्याविरोधातही आणखी एक सुरेश भोळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून जळगावमध्ये माजी महापौर जयश्री सुनिल महाजन यांना तिकीट देण्यात आलं आहे. या मतदारसंघात आणखी दोन जयश्री सुनिल महाजन यांनी अर्ज दाखल केले आहेत, म्हणजेच या मतदारसंघात तीन जयश्री सुनिल महाजन आणि दोन सुरेश भोळे निवडणूक लढणार आहेत.
सेम नावाचा तटकरेंना फटका
2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरे यांना सारख्याच नावाच्या उमेदवाराचा फटका बसला आणि ते निवडणुकीत पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंचा अनंत गितेंनी 2,110 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढणाऱ्या सुनिल तटकरेंनी 9,849 मतं घेतली होती.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरीतून बाबू भगरे अपक्ष रिंगणात होते, त्यांना पिपाणी हे चिन्ह मिळालं होतं. तर याच मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तुतारीच्या चिन्हावर भास्कर भगरे लढत होते. अपक्ष निवडणूक लढणाऱ्या बाबू भगरे यांना एक लाखापेक्षा जास्त मतं मिळालं होती.