डोंबिवली: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. लोकसभेत मनसेनं महायुतीला मदत केली होती. पण, विधानसभेला मात्र गणित बदलं आहे. अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध मनसे अशी लढत होत आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेच्या राजू पाटील यांच्याविरोधात शिवसेनेनं उमेदवार दिला आहे. याच खेळीवर राजू पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली असून ‘राज ठाकरे मोठ्या मनाचे आहेत हे कोत्या मनाचे आहेत’ असं म्हटलं आहे.
ठाणे जिल्ह्यात मनसेनं शिवसेनेसोबत छुपी युती केली होती. यानुसार मनसेनं शिवसेनेच्या जागांवर बहुतांश ठिकाणी उमेदवार दिले नव्हते. मात्र आज शिवसेनेनं ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेच्या एकमेव आमदाराविरुद्ध उमेदवार दिल्याने मनसेनं “हिच का परतफेड” असा प्रचार सुरू केला आहे. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी विचारले असता ते म्हणाले की, ‘याची पूर्व कल्पना होती कारण राज ठाकरे मोठ्या मनाचे आहेत हे कोत्या मनाचे आहेत’ अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, कल्याण ग्रामीण मतदारसंघात कुणी जागा सोडावी अशी अपेक्षाही केली नव्हती. आमचा पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी होता. हिंदुत्वाचे विचारधारा घेऊन जाणारे सक्षम उमेदवार आमच्यासमोर होते. त्यामुळे राज ठाकरेंनी तो निर्णय घेतला. आम्ही कोणत्या अपेक्षेनं पाठिंबा दिला नव्हता. राज ठाकरेंनी शिवतीर्थावर ज्या मागण्या केल्या त्यामधील एक मागणी मान्य झाली. या निवडणुकीत युती आमच्यासमोर आहे तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. जागा कुणी सोडावी अशी आम्ही अपेक्षाही केली नव्हती किंवा तशी मागणी नव्हती, असंही राजू पाटील यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. कल्याण ग्रामीणमधील मनसे आमदार राजू पाटील यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देणार नसल्याची चर्चा होती मात्र शिवसेनेने राजेश मोरे याना उमेदवारी दिल्याने या चर्चेला पूर्ण विराम मिळाला.
स्रोत: न्यूज 18 मराठी