मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गोंधळ सुरू होता. अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीने आपल्याच मित्रपक्षांविरोधात उमेदवार दिले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मैत्रिपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट हेलिकॉप्टरने शिवसेना आमदारांना एबी फॉर्म पाठवले, मुख्य म्हणजे हे दोन्ही उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधातच उभे राहणार आहेत. निवडणूक अर्ज भरायला अवघे काही तास शिल्लक असताना शिंदेंनी दिंडोरीमध्ये धनराज महाले यांना तर देवळालीमध्ये जयश्री अहिरराव यांना हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले.
महायुतीमध्ये दिंडोरीमधून राष्ट्रवादी काँग्रेसने नरहरी झिरवळ यांना तर देवळालीमधून सरोज आहिरे यांना उमेदवारी दिली आहे, पण तरीही शिवसेनेने या मतदारसंघातून धनराज महाले आणि जयश्री अहिरराव यांना तिकीट दिलं आहे.
नाशिकमध्ये महायुतीत वाद
महायुतीत नाशिकमध्ये वाद पाहायला मिळत आहेत. देवळाली आणि दिंडोरी पाठोपाठ नांदगाव आणि येवल्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादीतले वाद चव्हाट्यावर आले आहेत. नांदगावमध्ये शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्याविरोधात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, याशिवाय नांदगावमध्ये नावात साधर्म्य असलेल्या सुहास कांदे नावाच्या आणखी एका व्यक्तीने अपक्ष अर्ज दाखल केला आहे. सुहास कांदे नावाच्या दुसऱ्या उमेदवाराला समीर भुजबळांचं पाठबळ असल्याचा आरोप सुहास कांदेंच्या समर्थकांकडून केला जात आहे.
दुसरीकडे शिवसेनेच्या सुहास कांदे यांनी येवल्यामध्ये छगन भुजबळ यांच्याविरोधातही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. समीर भुजबळांनी नांदगावमध्ये अर्ज भरल्यामुळे सुहास कांदेंनी येवल्यातूनही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
स्रोत: न्यूज 18 मराठी