दिवाळी सण जवळ आला आहे, आणि हिंदू पंचांगानुसार, यंदा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त १ नोव्हेंबरला आहे. लक्ष्मीपूजनाला हिंदू परंपरेत अत्यंत महत्त्व आहे, कारण ही पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी आणि वैभवाची देवता लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते. परंतु, यंदा अमावस्येची तिथी दोन दिवस येत असल्याने अनेकांमध्ये लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
आता कोणता मुहुर्त चांगला आणि नक्की कधी लक्ष्मी पुजा करायची? याबद्दल जाणून घेऊ.
ज्योतिष शास्त्रानुसार, लक्ष्मीपूजन करण्यासाठी ‘प्रदोष काळ’ आणि ‘वृषभ काळ’ हे सर्वात शुभ मानले जातात. यावेळी पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होतात, असे मानले जाते. यावर्षी १ नोव्हेंबरला संध्याकाळी 5.36 ते 8.15 या वेळेत हा विशेष मुहूर्त आहे. त्यामुळे घरातील प्रमुखांनी या काळात लक्ष्मीपूजन करावे, असा सल्ला दिला जातो.
लक्ष्मीपूजन करताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. पूजा करण्यापूर्वी घर पूर्ण स्वच्छ करणे, मूर्ती पूर्व दिशेला ठेवणे आणि पूजास्थळी शांतता राखणे आवश्यक आहे. पूजेला सोनं-चांदीच्या वस्तू अर्पण कराव्यात; मात्र लोखंडी भांडी टाळावीत. पूजा करताना इतरांनी शांतता राखून बसावेत आणि लक्ष्मीला ताजे फुलं, सुगंधी धूप अर्पण करावे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही विशेष गोष्टी टाळाव्यात. या दिवशी मद्यपान, मांसाहार किंवा कांदा-लसूण खाणं अशुभ मानलं जातं. तसेच, या दिवशी पैशांचं उधार देणं किंवा काळ्या रंगाचे कपडे घालणं टाळावं, कारण यामुळे लक्ष्मीच्या कृपेत बाधा येते, असे ज्योतिषी सांगतात. घरातील स्त्री सदस्यांचा अनादरही करु नये, कारण त्यामुळे आयुष्यात अशुभता येऊ शकते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही लक्ष्मीपूजनाला घराघरात आनंद आणि उत्साह भरला असेल. परंपरेप्रमाणे योग्य मुहूर्तावर पूजा करून आपल्या घरासाठी समृद्धीची कामना करावी. दिवाळीच्या या मंगलमय काळात सुख-समृद्धी आणि समाधान मिळवण्यासाठी या पूजेचं महत्त्व अधिक आहे, असं म्हणायला हरकत नाही.
स्रोत: न्यूज 18 मराठी