पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत शह देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत गाठीभेटींना सुरुवात केली आहे. अजित पवारांनीही निवडणुकीसाठी यंत्रणा कामाला लावली असून, दोन्ही पवारांचा दिवाळीचे सलग चार दिवस बारामतीतच मुक्काम असणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीमधून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून युगेंद्र पवार निवडणूक लढविणार असून, त्यांचा सामना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना शह देण्याची जोरदार तयारी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अजित पवार तीन दिवस बारामतीमध्ये आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दिवाळीचे चार दिवस आपला मुक्काम बारामतीतच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुक्कामात पक्षाचे कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, नेते, यांच्यासह समाजातील विविध घटकांतील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे नियोजन या दोन्ही नेत्यांनी केले आहे.
बारामतीमध्ये पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य दर वर्षी एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. मात्र, दीड वर्षापूर्वी अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पवार कुटुंबीयांमध्येही कटुता आली. अजित पवार वगळता पवार कुटुंबातील इतर व्यक्ती दिवाळीसाठी एकत्र आल्याचे गेल्या वर्षीच्या दिवाळीत पाहायला मिळाले. अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कुटुंबातील इतर व्यक्तीदेखील त्यांच्यावर नाराज असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते. मात्र, या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कौल देऊन त्यांना संसदेत पाठवले. त्यानंतर, ‘लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना तिकीट दिले, ही मोठी चूक झाली,’ अशी कबुली अजित पवार यांनी जाहीरपणे दिली.
भेटीगाठी, सभा आणि मेळावे
हे दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन ते चार दिवस बारामतीमध्ये मुक्कामी असल्याने दिवाळीत आणि दिवाळीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. दोन्ही नेते बारामती तालुक्यात सभाही घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार १, २, व ३ नोव्हेंबर, असे दिवाळीचे तीन दिवस पूर्ण बारामती तालुका पिंजून काढणार आहेत. प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचा ते प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनीच जाहीर सभेदरम्यान दिली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार हेदेखील ५ नोव्हेंबर रोजी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, सुपे, मोरगाव व सोमेश्वर येथे सभा घेणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी व्यापारी, वकील व डॉक्टरांशीही ते संवाद साधणार आहेत.
स्रोत: लोकसत्ता