पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने दोन कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी इसाक बागवान (रा. सांगली), इस्माईल, दस्तगीर पटेल, जहाँगीर खान, जिशान रियाज हेबळीकर, तसेच समाज माध्यमातील ब्लॅक ऑरा वाहिनीचे चालक रवी निले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार व्यावसायिक आहेत. इसाक बागवान, त्याच्या साथीदारांनी समाज माध्यमात ब्लॅक ऑरा नावाने वाहिनी सुरू केली. आभासी चलनात गुंतवणूक केल्यास दीड वर्षात तीनपट परतावा मिळेल, तसेच गुंतवणुकीवर दररोज एक टक्के परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी तक्रारदाराला दाखविले होते. आभासी चलनात अन्य गुंतवणुकदारांना प्रोत्साहित केल्यास पाच टक्के परतावा खात्यात जमा केला जाईल, असे सांगून आरोपींनी तक्रारदाराला गुंतवणूक करण्यास सांगितले.
तक्रारदाराने ४० लाख रुपये आरोपींना दिले, तसेच त्यांच्या ओळखीतून काहीजणांना पैसे गुंतवणूक सांगितले. तक्रारदारासह त्यांच्या मित्राने आभासी चलनात दोन कोटी १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर गेल्या दोन वर्षात तक्रारदारासह अन्य गुंतवणूकदारांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करत आहेत.
स्रोत : लोकसत्ता