Sunil Tatkare On Jayant Patil : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी तासगावमध्ये झालेल्या एका सभेत कथित सिंचन घोटाळ्यासंदर्भात माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांच्याबाबत भाष्य केलं. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांना इशारा दिला आहे. “अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर मला देखील पक्षांतर्गत अनेक गोष्टी बोलता येतात”, असं सुनिल तटकरेंनी म्हटलं आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
“शरद पवार काय म्हणतात, याबाबत आम्ही काहीही बोलणार नाहीत. मात्र, महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. त्या योजनेबाबत संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना आत्मीयता वाटते. लाडक्या बहिणींबाबत निर्माण झालेला विश्वास हा आमच्यासाठी महत्वाचा आहे. कारण निवडणुका येतात आणि जातात”, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.
सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
सुनील तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, “२०१४ साली निवडणुकीचा निकाल समोर यायच्या आधी आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता. जेव्हा पाठिंबा देण्यात आला होता, त्यावेळी मी देखील स्वत: त्या ठिकाणी होतो. तेव्हा शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवेळी मी (सुनील तटकरे), छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. मात्र, त्यावेळी जयंत पाटील त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना काही गोष्टींची माहिती नसेल. २०१४ साली १६-१६- अशा पद्धतीचा फॉर्म्युला ठरला होता. पुढे २०१७ मध्ये आम्ही सत्तेतही सहभागी होणार होतो. तेव्हा जयंत पाटील यांना माहिती नव्हतं की, त्यांना कोणतं खातं मिळणार होतं. त्यामुळे त्यांनी आता टीका करण्यापेक्षा अशा प्रकारची वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. अन्यथा मला देखील अनेक गोष्टी माहिती आहेत. विनाकारण काहीही बोलून अजित पवारांना नेहमीप्रमाणे व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर मला देखील पक्षांतर्गत अनेक गोष्टी बोलता येतात. मग मला देखील सर्व गोष्टी तारखेनुसार सांगाव्या लागतील”, असा इशारा सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांना दिला.
स्रोत : लोकसत्ता