Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 7:54 pm

MPC news

जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार, मनसेचे आमदार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदे पिता पुत्रांवर घणाघात

ठाणे : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनी राजेश मोरे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर मनसेचे कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार आणि सध्या अधिकृत उमेदवार असलेले राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. या बाप – बेट्यांची दानत मला माहिती आहे. आमच्या विरोधात उमेदवार दिला याबाबत आम्हाला आश्चर्य नाही कारण जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार, अशी टीका करून राजू पाटील यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. तर पक्षनेतृत्वामुळे आम्ही गप्प होतो मात्र सगळा वचपा आता काढला जाईल असा इशारा देखील राजू पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे. यामुळे कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसैनिक विरुद्ध मनसैनिक असा तीव्र संघर्ष पाहायला मिळू शकतो.

लोकसभा निवडणुकीवेळी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री पुत्र डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊन प्रचार केला होता. तर खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसेचे राजू पाटील आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली होती. खासदार डॉ.शिंदे यांना मिळालेल्या सुमारे १ लाखांहून अधिकच्या मताधिक्यात राजू पाटील यांचा देखील मोलाचा वाटा होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी याची परतफेड करून शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) मनसेला साथ दिली जाईल अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांच्या विरोधात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राजेश मोरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. याबाबतची तीव्र नाराजी आता राजू पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाले राजू पाटील ?

कल्याण ग्रामीण मध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनी उमेदवार दिला याबाबत आम्हाला आश्चर्य अजिबात नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्व मनसैनिकांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यात मोठी मेहनत घेतली होती. या बाप – बेट्यांची दानत मला माहिती आहे. आमच्या विरोधात उमेदवार दिला याबाबत आम्हाला आश्चर्य नाही कारण जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार. मला देखील पाच वर्षात खूप त्रास दिला आहे. माझ्या अनेक कामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. जो राग मी गेले पाच वर्ष दाबून ठेवला होता तो आता सगळा काढणार कारण वचपा काढण्याची संधीच त्यांनीच मला दिली आहे. मी केलेल्या विकासकामांवर स्वतःच्या पाट्या लावून गेले आहेत. पक्षनेतृत्वामुळे आम्ही गप्प होतो मात्र सगळा वचपा आता काढला जाईल. असा इशारा देत राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे.

स्रोत : लोकसत्ता

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर