Bhindi masala recipe: रोज काय भाज्या करायच्या हा नेहमीचाच प्रश्न आहे. त्यात हिरव्या भाज्या म्हंटलं की पौष्टिक असूनही अनेकांचा पालेभाजीला नकार असतो. भेंडीची भाजी म्हंटलं की अनेकजण नाक मुरडतात. भेंडी ही काहींच्या खूप आवडीची असते तर काहींना अजिबात आवडत नाही. भेंडीमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असते अनेक गुणधर्म असतात. मात्र काहींना भेंडीचा चिकटपणा आवडत नाही. मात्र आज ही भेंडीची रेसिपी ज्यांना भेंडी आवडत त्यांनाही नक्की आवडेल. चला तर पाहूयात भेंडीची खट्टी -मीठी भाजी.
भेंडीची खट्टी -मीठी भाजी साहित्य
१/२ किलो कोवळी भेंडी मोठ्या तुकड्यांमध्ये कापलेली
१ मोठा चमचा आमचूर पावडर
८ लसणाच्या पाकळ्या
१/४ चमचा हळद दीड चमचा तिखट
चवीनुसार मीठ पाऊण चमचा साखर
१ मोठा चमचा दाण्याचा कूट
१ टेबलस्पून तेल
१/२ चमचा जीरे अर्धा चमचा मोहरी चिमूटभर हिंग
भेंडीची खट्टी-मीठी भाजी कृती
प्रथम भेंडी आदल्याच दिवशी धूवून निथळत ठेवावी. दुसऱ्या दिवशी त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्याव्या. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे.
तेल तापलं की हिंग मोहरी जीरं व लसणाची फोडणी द्यावी. त्यामध्ये कापलेली भेंडी घालून हळद तिखट आमचूर पावडर मीठ, साखर घालून छान परतावे.
मध्यम गॅसवर भेंडी छान फ्राय करत शिजू द्यावी. भेंडी शिजल्यावर त्यामध्ये दाण्याचा कूट घालावा व गॅस बंद करावा. ही भाजी टेस्टला आंबट गोड तिखट अतिशय टेस्टी लागते सगळ्यांनाच खूप आवडते.
स्रोत: लोकसत्ता