ठाणे : विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असल्या तरी दिवाळी निमित्ताने आणि पक्षातील बंडखोरींमुळे प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या. आता बहुतांश बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. या कालावधीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात शहर पोलिसांच्या बंदोबस्तासह केंद्रीय पोलीस दलाच्या सात तुकड्या, तपासणी नाके, भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील मतदारसंघात रुट मार्च देखील काढला जात आहे. रात्रीच्या वेळात पोलिसाच्या पथकांकडू गस्ती घातली जात आहे. अमली पदार्थांच्या तस्करीवरही पोलिसांचे लक्ष आहे.
निवडणूका शांततेत आणि निष्पक्ष पार पाडल्या जाव्यात यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असतात. ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधासभा मतदारसंघ आहेत. यातील बहुतांश मतदारसंघ ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्राच्या हद्दीत आहेत. निवडणूकांच्या कालावधीत आयुक्तायल क्षेत्रात आचारसंहितेचा भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ४० हून अधिक ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. याठिकाणी संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी भरारी पथके देखील तैनात आहेत. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अतिरक्त मनुष्यबळ तैनात केला जात असतो.
त्यामुळे केंद्रीय पोलीस पथकातील सात तुकड्या ठाणे आयुक्तालय क्षेत्रात दाखल झाल्या आहेत. तर पाच तुकड्या लवकरच दाखल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील तैनात केल्या आहेत. पोलिसांकडून गुन्हेगारांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक कारवाई देखील पोलिसांनी सुरू केल्या आहेत. रात्रीच्या वेळेत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून गस्ती घातली जात आहे. मागील काही दिवसांपासून पोलिसांनी बेकायदा शस्त्र पोलिसांकडून जप्त केले आहे. तसेच संवेदनशील मतदारसंघात पोलिसांचा रुट मार्च काढला जात आहे.