मुंबई : पोलीस दलाच्या वाहनांमधून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना रसद पुरविली जात असल्याचा आरोप, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार, नगरसह अन्य भागांमधील राजकीय संघर्ष हाताळण्यावरून पोलिसांच्या भूमिकेवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह या कारणांमुळे अखेर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून तात्काळ हटविण्याचा आदेश निवडणूक आयोगाने सोमवारी दिला. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.
भाजपच्या मागणीवरून निवडणूक होत असलेल्या झारखंडमध्ये पोलीस महासंचालकांची उचलबांगडी करण्यात आली असताना राज्यात विरोधकांच्या तक्रारीनंतरही शुक्ला यांना अभय दिले जात असल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अखेर निवडणूक आयोगाने शुक्ला यांना पदावरून हटविण्याचा आदेश दिला. विरोधी नेत्यांचे दूरध्वनी टॅपिंगप्रकरणी शुक्ला वादग्रस्त ठरल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. महायुतीचे सरकार येताच शुक्ला यांना अभय देण्यात आले व त्यांची पोलीस दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. राज्यातील निवडणुका नि:पक्षपातीपणे होण्यासाठी शुक्ला यांना हटविण्याची मागणी महाविकास आघाडीने सातत्याने लावून धरली होती. वाहनांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरविली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला तीन वेळा पत्र लिहून गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील राजकीय वातावरण गढूळ होत चालले असून पोलिसांच्या भूमिकेविषयी शंका घेतली जात आहे. पोलीस दलात वरिष्ठ पातळीवरून पक्षपाती वर्तनाचे आदेश दिले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले.
वादग्रस्त कारकीर्द
– विरोधी नेत्यांचे दूरध्वनी टॅप करण्याचे आदेश रश्मी शुक्ला यांनी दिल्याचे कागदोपत्री पुरावे सापडले होते. त्यानंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची योजना होती. पण शुक्ला यांनी आपली भेट घेऊन विनवणी केल्यानेच कारवाई करण्यात आली नव्हती, असे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले होते.
– नियत वयोमानानुसार शुक्ला या जूनमध्ये निवृत्त होणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारमधून दोन वर्षांसाठी नियुक्तीचा आदेश मिळविला होता. ‘नागपूर’बरोबर असलेल्या घनिष्ठ संबंधामुळे शुक्ला यांचे प्रस्थ वाढल्याचे सांगण्यात येते.
– त्यांच्यावर विरोधी नेत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतो.
●काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात मोठा राजकीय संघर्ष झाला. विखे पाटील यांचे समर्थक वसंत देशमुख यांनी थोरात यांच्या कन्या जयश्री यांच्याबद्दल अपशब्द वापरले.
●त्यानंतर देशमुख यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या जयश्री आणि त्याच्या समर्थकांना पोलिसांनी अनेक तास थांबवून ठेवले आणि उलटपक्षी त्यांच्यावर गु्न्हे दाखल केले.
●याप्रकरणी पोलिसांच्या पक्षपाती भूमिकेवर विरोधकांनी आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाने नेमलेल्या दीपक मिश्रा, बी. आर. बालकृष्णन आणि राम मोहन मिश्रा विशेष निरीक्षकांनी अहमदनगरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
●त्यांनी आपल्या अहवालात पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करून त्यांच्या कामात राज्यस्तरावरून हस्तक्षेप झाल्याचे नमूद केले होते. हा शुक्ला यांच्याकडेच अंगुलीनिर्देश असल्याचे मानले जात आहे.
●या कारवाईविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी शुक्ला यांनी सुरू केल्याची माहिती गृहविभागातील सूत्रांनी दिली.
नवे महासंचालक कोण?
रश्मी शुक्ला यांना पदावरून हटविण्याचा आदेश दिल्यावर नवीन पोलीस महासंचालकपदासाठी मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत नावांची यादी सादर करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. महासंचालकपदासाठी सेवाज्येष्ठतेनुसार शुक्ला यांच्यानंतर फणसळकर, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार या तिघांची नावे पाठविण्यात येणार आहेत.
स्रोत : लोकसत्ता