AUS vs PAK Pat Cummins responding to Kamran Akmal mockery of the Australian : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली होती. दरम्यान, सामन्यादरम्यान एका पाकिस्तानी फलंदाजाने ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली उडवली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्या फलंदाजाची बोलती बंद केली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात १९व्या षटकात ही घटन घडली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्स हे षटक टाकत होता. कमिन्सने या षटकातील पाचवा चेंडू टाकल्यानंतर कामरान गुलामने बचावात्मक शॉट खेळला. यानंतर त्याने स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेनसारखी कृती केली.
स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेन कसोटी क्रिकेटमध्ये चेंडूचा बचावात्मक शॉट खेळल्यानंतर धाव घ्यायची नसताना असे करतात. कामरान गुलामने अगदी त्या दोघांसारखीच नक्कल केली. यानंतर पुढच्याच चेंडूवर पॅट कमिन्सने कामरान गुलामला वेगवान बाऊन्सर टाकला. जो कामरानला समजला नाही आणि चेंडू ग्लोव्हजला लागून यष्टीरक्षक जोस इंग्लिसच्या हातात विसावला, ज्यामुळे कामरान गुलाम झेलबाद झाला. अशा प्रकारे पॅट कमिन्सने विकेट घेत कामरान गुलामला चोख प्रत्युत्ततर दिले.
पाकिस्तानचे फलंदाज पुन्हा ठरले अपयशी –
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद मोहम्मद रिझवानकडे आहे. रिझवानच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान विशेष फरक दिसला नाही. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानचा संघ फलंदाजीसाठी मैदानात आला आणि ४६.४ षटकात २०३ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ४४ धावा केल्या. याशिवाय नसीम शाहने ४० धावांची झटपट खेळी केली. ज्यामुळे संघाला २०० धावांचा टप्पा पार करता आला.
स्रोत : लोकसत्ता