Pakistan Former Cricketer Slams Gautam Gambhir IPL like Tactics: भारतीय संघाला मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध कसोटी इतिहासातील लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंडने भारतात कसोटी मालिका तर जिंकली पण तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिन्ही सामने जिंकत भारताला मोठा धक्का दिला. या मालिकेतील भारताच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. खेळाडूंबरोबरच नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता भारताच्या कामगिरीवर पाकिस्तानच्या माजी खेळाडूने द्रविडचा उल्लेख करत मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत विजयासाठी १४७ धावांचे आव्हान दिले होते. भारतीय संघाने कसोटी मालिका आधीच २-० ने गमावली होती. पण तिसरा सामना जिंकण्याची संधी संघाकडे होती. पण भारताच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. भारताच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. ऋषभ पंतच्या ६४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघ जिंकेल अशी आशा होती. पण वानखेडेवरील फिरकीला अनुकूल लाल मातीच्या खेळपट्टीवर भारतीय संघ फार काळ टिकू शकला नाही आणि परिणामी संघाला २५ धावांनी पराभव पत्करावा लागला.
पाकिस्तानच्या माजी खेळाडूने व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरच्या IPL रणनितीवर ओढले ताशेरे
भारताच्या या मोठ्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अलीने संघाच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आयपीएल सामन्यांमधील रणनितीवरून त्याला सुनावलं आहे. बासित अली म्हणाला, “आज भारताला राहुल द्रविडची आठवण येत असेल. राहुल द्रविड कसोटी सामन्यापूर्वी ४ दिवसांचं प्लॅनिंग करायचे. हे लोक २ किंवा अडीज दिवसांचं प्लॅनिंग करतात.”
बासित अली पुढे म्हणाला, “तुम्ही आजकाल प्रशिक्षकांच्या मुलाखती ऐकत असाल की कसोटी सामने हल्ली ड्रॉ होत नाहीत. हो बरोबर आहे. पण तुम्ही आयपीएलचे जेतेपद जिंकून आला आहात आणि म्हणून कसोटी सामना पण त्याच पद्धतीने खेळला पाहिजे, असा त्याचा अर्थ होत नाही. टी-२० क्रिकेट हे फार वेगळं आहे. अश्याने तुमचा कसोटी सामना खराब होईल.”
इंग्लंडच्या बॅझबॉलचं उदाहरण देत पाकिस्तानचा माजी खेळाडू पुढे म्हणाला, “सर्वच जण आता बॅझबॉलची कॉपी करू पाहतायत. पण बॅझबॉल म्हणजेच इंग्लंड अजूनपर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे का? मग बॅझबॉलप्रमाणे खेळण्याचा उपयोग काय?”
भारताने टर्निंग खेळपट्टी बनवली याबाबत बासित अली म्हणाला, “तुम्ही मुंबईत फिरकीला अनुकूल खेळपट्टी तयार केली, त्यात वेगवान गोलंदाजांचं योगदान काय होतं, तर शून्य, त्या खेळपट्टीवर खेळताना फलंदाजांचा आत्मविश्वास शून्य, आणि आता संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार आहे, तिथे संघाचा आत्मविश्वासही शून्यच असणार आहे.” पाकिस्तानच्या माजी खेळाडूने भारताच्या कामगिरीवर आणि संघ व्यवस्थापनाच्या निर्णयांवर ताशेरे ओढले आहेत.
स्रोत : लोकसत्ता