Sunil Gavaskar Prediction on Border Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. या मालिकेकसाठी भारतीय संघ काही दिवसांत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. २२ नोव्हेंबरपासून या मालिकेला पर्थमध्ये सुरुवात होईल. यानंतर इतर सामने ॲडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी येथे खेळले जाणार आहेत. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाबद्दल मोठे विधान केले आहे.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयाच्या शक्यतांवर सुनील गावस्करांनी मोठे विधान केले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) २०२३-२५ च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला पाचपैकी किमान चार कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत. परंतु सुनील गावस्करांना वाटते भारतीय संघ चार सामन्या जिंकू शकणार नाही. त्यांनी असे भाकीत केले आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या चार कसोटी मालिका जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी दोन ऑस्ट्रेलियात झाल्या आहेत. २०१४/१५ च्या हंगामात ऑस्ट्रेलियाने भारताला कसोटी मालिकेत पराभूत केले होते. म्हणजे या गोष्टीला जवळपास १० वर्षें उलटून गेली आहेत, तरी कांगारु संघाला भारताविरुद्ध जिंकता आलेली नाही.
भारत ऑस्ट्रेलियाला ४-० ने पराभूत करु शकणार नाही –
यंदा टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला ४-० ने पराभूत करू शकणार नाही, असा विश्वास सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे. तथापि, गावस्कर यांनी असेही सांगितले की भारताचे लक्ष केवळ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर असले पाहिजे आणि डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शक्यतेवर नसावे. इंडिया टुडेशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, “नाही, मला वाटत नाही. मला खरोखर वाटते की भारत कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला ४-० ने पराभूत करू शकत नाही. त्यांनी तसे केल्यास मला खूप आनंद होईल. भारत ३-१ च्या फरकाने जिंकू शकतो. पण ४-० ने नाही. मला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलबद्दल बोलायचे नाही.”
भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर लक्ष देऊ नये –
सुनील गावस्कर पुढे म्हणाले, “मला वाटते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर लक्ष न देता, भारतीय संघाने आता फक्त ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित करावे. मग तुम्ही ही मालिका १-०, २-०, ३-०, ३-१ किंवा, २-१ च्या फरकाने जिंकलात तरी काही फरक पडत नाही. मात्र, पुढे जा आणि जिंका. कारण त्यामुळेच आपल्या सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा बरे वाटेल.”
स्रोत: लोकसत्ता