Explore

Search
Close this search box.

Search

December 4, 2024 12:09 pm

MPC news

नवीन महाबळेश्वरला केवळ १०० सूचना-हरकती, आराखड्यावर सूचना-हरकती नोंदविण्यासाठी अखेरचे ४ दिवस

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) साताऱ्यात नवीन महाबळेश्वर वसविले जाणार आहे. यासाठी एमएसआरडीसीकडून प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या विकास आराखड्याला, नवीन महाबळेश्वर वसविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला नवीन महाबळेश्वरमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावातील नागरिकांसह पर्यावरणप्रेमींकडून पर्यावरणाच्या मुद्द्यावरून विरोध केला जात आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे, या आराखड्यावर आतापर्यंत केवळ १०० जणांकडूनच सूचना-हरकती सादर झाल्या असून, त्या सादर करण्यासाठी अखेरचे चार दिवस शिल्लक आहेत.

राज्यातीलच नव्हे तर देशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे, महाबळेश्वरवरील ताण वाढत आहे. हा ताण कमी करण्यासाठी महाबळेश्वरनजीक नवीन महाबळेश्वर वसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याची जबाबदारी एमएसआरडीसीवर टाकण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर एमएसआरडीसीने ११५३ चौ. किमी क्षेत्रावरील २३५ गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करत तो प्रसिद्ध केला. दरम्यान, नवीन महाबळेश्वरला स्थानिकांचा आणि पर्यावरणप्रेमींचा प्रचंड विरोध आहे. या प्रकल्पामुळे २३५ गावांतील पर्यावरणाला धक्का बसणार असल्याचे सांगत प्रकल्पास विरोध केला जात आहे. प्रकल्प रद्द करण्याचीही मागणी होत आहे. तर, शेकडोंच्या संख्येने सूचना-हरकती सादर करण्याचे आवाहनही केले जात होते.

परंतु, प्रकल्पाला एकीकडे मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना प्रकल्पाच्या आराखड्यावर सूचना-हरकती मात्र म्हणाव्या तशी प्राप्त झालेल्या नाहीत. आतापर्यंत केवळ १०० नागरिक अथवा संस्थांकडून सूचना-हरकती प्राप्त झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली. सूचना-हरकती सादर करण्यासाठी केवळ चार दिवस शिल्लक असून ही मुदत ९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे, या चार दिवसात आता किती सूचना-हरकती सादर होतात हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे.

आराखड्यात काय?

नवीन महाबळेश्वरमधील २३५ गावांपैकी अनेक गावे आणि पर्यटनस्थळे दुर्गम भागात असल्याने तिथे पोहचण्यासाठी सक्षम अशी वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे प्रारूप विकास आराखड्यात वाहतूक आणि दळणवळणालाही प्राधान्य देण्यात आले आहे. येथील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी येथे ३४ किमीचे नवीन रस्ते बांधले जाणार असून घाटमाथ्यावर ९० किमीची रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याच वेळी, ७४ किमीचे नेचर ट्रेल, ४८ किमी लांबीचे सायकल ट्रॅक, २६ किमी लांबीचा रोप वे मार्ग आणि एक किमी लांबीची फ्युनिक्युलर रेल्वेही एमएसआरडीसीने प्रस्तावित केली केली आहे. तर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी येथे उद्याोग समृद्धी केंद्र, पर्यटन सुविधा केंद्र, पर्यटन विकास केंद्र विकसित केली जाणार आहे. यासाठी कौशल्य विकास केंद्रही उभारले जाणार आहे.

स्रोत : लोकसत्ता

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर