“अखेर मला पक्षाबाहेर ढकलण्यात त्यांना यश आलं. खंत एकच की, खंजीर समोरून नाही, मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला. राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे”, असं अखिल चित्रे म्हणाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यभरात एक मोठा चाहता वर्ग आहे. राज्यातील अनेक तरुण हे राज ठाकरे यांना मानतात. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. मनसे पक्षाचा जन्म झाल्यानंतर राज ठाकरेंचा राज्यात जो झंझावात झाला त्याचा मोठा प्रभाव आजच्या तरुण पिढीत लहान असताना झाला. त्यामुळे ही पिढी राज ठाकरे यांच्याकडे फार आशेने पाहते. राज ठाकरे यांना आपलं मानते. राज ठाकरे यांना राज्यातील जनतेने संधी द्यावी, असं अनेक तरुणांना आजही वाटतं. अनेक तरुण राज ठाकरे यांच्या शिलेदारांना फेसबुक, ट्विटरवर प्रकर्षाने फॉलो करतात. मनसे म्हटलं की आपला प्रश्न सुटणार असं ते उराशी बाळगतात. पण त्यांच्याच पक्षाचे शिलेदार ट्विट करत पक्षाला सोडून जातात, तेव्हा तरुणांच्या मनात अनेक विचार घोळतात. कारण विषय तसाच आहे. मनसेचे तरुण नेते अखिल चित्रे यांनी आज पक्षाला रामराम केलाय आणि त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पण त्याआधी त्यांनी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता जे ट्विट केलं आहे त्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अखिल चित्रे यांचं ट्विट नेमकं काय?
अखिल चित्रे यांनी आपल्या अधिकृत एक्स (X) अकाउंटवरुन ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी खळबळजनक दावा केला आहे. “अखेर मला पक्षाबाहेर ढकलण्यात त्यांना यश आलं. खंत एकच की, खंजीर समोरून नाही, मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला. राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे. सावध राहा. असो, जय महाराष्ट्र!”, असं अखिल चित्रे म्हणाले आहेत. अखिल चित्रे यांचं हे ट्विट बरंच काही सांगत आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली तेव्हा त्यांनी त्यांच्या काकांबद्दल तसंच वक्तव्य केलं होतं.
अखेर मला पक्षाबाहेर ढकलण्यात त्यांना यश आलं… खंत एकंच की खंजीर समोरून नाही, मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला… राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा…. असो, जय महाराष्ट्र!
आपल्या काकांच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांमुळे आपण दूर लोटलो गेलो, असं राज ठाकरे त्यावेळी जाहीर सभांमधून म्हणाले होते. त्यानंतर आता अखिल चित्रे तसं म्हणाले आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते नितीन नांदगावकर यांनीदेखील पक्षाला सोडचिठ्ठी देताना तसंच काहीसं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मनसेच्या अशा तरुण नेत्यांची घुसमट राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचत नसेल का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.