Jaydeep Apte High Court Bail : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे याला पश्चाताप झालाय का? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणात त्याने हायकोर्टात जामीनासाठी धाव घेतली आहे. या प्रकरणात त्याला निष्काळजीपणा झाल्याचे जणू मान्यच नसल्याचे दिसून येत आहे.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यात अटक करण्यात आलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याला पश्चातापाचा लवलेश नसल्याचे समोर येत आहे. पुतळा उभारताना आपटेने निष्काळजीपणा केल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यातीलच नाही देशातील शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्धघाटन केले होते. हा पुतळा घाईगडबडीत उभारल्याचा विरोधकांचा आरोप होता. आता याप्रकरणात हात झटकण्याचा प्रयत्न आपटे करताना दिसत आहे. त्याने जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.
म्हणे वाऱ्यानेच कोसळला पुतळा
शिल्पकार जयदीप आपटेने जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यात पुतळा कोसळून कोणत्याही व्यक्तीला कसलीही शारिरीक दुखापत, इजा झाला नसल्याचा दावा त्याने केला आहे. एफआयआरमध्ये तसा उल्लेख नसल्याचा त्याचा दावा आहे. तर हा पुतळा कोसळण्यासाठी त्याने सोसाट्याचा वाऱ्याला दोष दिला आहे.
आपटेने पाजळले सरकारला ज्ञान
सोसाट्याच्या वाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याचा कांगावा जयदीप आपटे याने केला आहे. आपल्याला या प्रकरणात सरकारने नाहक गोवण्यात आले आहे. अशा घटनेला मानवी कृत्य जबाबदार धरण्यात येऊ शकत नाही, असा त्याचा दावा आहे. नेव्हल डॉकयार्डने पुतळा उभारल्यानंतर तपासणी केली होती. त्यावेळी त्यांनी कामात त्रुटी असल्याची तक्रार दिली नव्हती. पण दुर्घटना घडल्यानंतर बांधकाम विभागाच्या अभियंत्याने त्रुटी असल्याचे सांगत अवघ्या नऊ तासातच एफआयआर दाखल केल्याचे त्याचे म्हणणे आहे. याप्रकरणात तज्ज्ञांची समितीचा अहवाल आल्यानंतर आपल्याविरोधात पुढील कारवाई व्हायला हवी होती, असे त्याने जामीन अर्जात म्हटले आहे.
हायकोर्टात जामीनासाठी धाव
जयदीप आपटे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने सिंधुदुर्ग जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्याने आता मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. प्रकरणात सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. या जामीन अर्जावर आता 12 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.
स्रोत: tv 9 मराठी