Abdul Sattar : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचाराचा धडाका सुरु आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रमुख सामना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यातच काही नेत्यांचे वक्तव्य राज्याचा राजकारणात चर्चेचे ठरत आहेत. शिवसेनेचे (शिंदे) नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच आपल्या विधानामुळे चर्चेत असतात.
आता ऐन निवडणुकीत मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या एका विधानामुळे ते चर्चेत आले आहेत. “मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो”, असं विधान अब्दुल सत्तार यांनी एका सभेत बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा नेमकी अर्थ काय? त्यांच्या या विधानाचा रोख नेमकी कुणाकडे? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहेत.
अब्दुल सत्तार काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या ठिकठिकाणी प्रचाराच्या सभा पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार एका सभेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “जो नेता तुमच्या भल्यासाठी काम करतो. जो नेता तुम्ही मतदान केल्यानंतर त्या मतांचा उपयोग चांगल्यासाठी करतो. आता जर मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवू शकतो, तर हे किरकोळ लोक काय आहेत?”, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. मात्र, हे विधान करताना अब्दुल सत्तार यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा रोख हा भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे होता, अशी चर्चा आहे.
पुढे बोलताना अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना इशाराही दिला. या निवडणुकीत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काही लोक माझ्यावर टीका करतात. मात्र, आपण गेल्या अनेक वर्षात लोकांनी कोट्यावधी रुपयांची विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे विकासाची कामे जो करेल त्याला मतदान करण्याचं आवाहनही यावेळी अब्दुल सत्तार यांनी केलं.
दरम्यान, महायुतीत असूनही शिवसेनेचे (शिंदे) मंत्री अब्दुल सत्तार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्याबाबत बोलताना स्वत:ची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. तसेच अब्दुल सत्तार यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे यांना डिवचलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
स्रोत: लोकसत्ता