वाराणसी (उत्तर प्रदेश), (पीटीआय) वाराणसीच्या कँट रेल्वे स्थानकावरील पार्किंग स्टँडला लागलेल्या आगीत 150 हून अधिक दुचाकी जळून खाक झाल्या, असे अधिकाऱ्यांनी आज सांगितले. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री प्लॅटफॉर्म वन पार्किंग स्टँडजवळ आग लागल्याने ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलिस (GRP) च्या पथकांनी आग विझवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली, असे त्यांनी सांगितले. आग आटोक्यात आणली गेली पण 150 हून अधिक वाहने राख झाली, असेही ते म्हणाले.
अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक लालजी चौधरी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले की, पार्किंग स्टँड रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आले असून आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, असे सांगून चौधरी म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.