India Corona Update : देशात ओमायक्रॉनचे 21 रुग्ण, गेल्या 24 तासांत 8,306 नव्या कोरोना रुग्णांची नोंद 

एमपीसी न्यूज – दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमायक्रॉनचा शिरकाव देशात झाला असून, देशातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 21 एवढी झाली आहे. त्यापैकी आठ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. दुसरीकडे गेल्या 24 तासांत देशभरात 8 हजार 306 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 8 हजार 834 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 46 लाख 41 हजार 561 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 40 लाख 69 हजार 608 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 98.35 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्या 98 हजार 416 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील तब्बल 552 दिवसांतील ही निचांकी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 211 रुग्ण दगावले असून, देशात आजवर 4 लाख 73 हजार 537 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा झाला आहे.

देशात आतापर्यंत 64.82 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. तसेच, कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 127.93 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.