Pune News : लग्नासाठी त्रास दिल्याने 22 वर्षीय घटस्फोटित तरुणीची आत्महत्या 

आधीच्या पतीसह प्रियकरावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 22 वर्षीय घटस्फोटित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तिच्या आधीच्या पतीसह प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. 

सोहम राजू गागडे आणि गिरीश प्रवीण मछले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर अपर्णा अनिल अभंगे अशी आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या आईने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली, त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अपर्णा हिचा सोहम गागडे याच्यासोबत विवाह झाला होता. परंतु सोहम याने तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन क्रूर वागणूक दिली होती. या छळाला कंटाळून तिने घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिचे गिरीश मछले याच्यासोबत प्रेम संबंध जुळले होते. ते दोघे लग्न सुद्धा करणार होते.

परंतु अपर्णा हिचा पहिला पति सोहम याला याची माहिती मिळाल्यानंतर त्याने आपण पुन्हा लग्न करून संसार थाटू अशी मागणी करुन अपर्णा हिचा छळ केला. तर लग्न करण्यासाठी गिरीश मछले याने देखील तगादा लावून अपर्णाला मानसिक त्रास दिला. या सर्व त्रासाला कंटाळून अपर्णा हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.