Pune News : 23 गावे की 21, महापालिका आणि जिल्हाधिकारी प्रशासनात संभ्रम !

एमपीसी न्यूज : राज्यसरकारकडून पुणे महापालिकेच्या हद्दी जवळील 23 गावे पालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असला तरी, या गावांच्या यादीतील 2 गावांचे अस्तित्वच कागदावर स्पष्ट होत नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

या गावांमध्ये मंतरवाडी तसेच न्यू कोपरे या दोन गावांचा समावेश असून या गावांबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट खुलासा करावा तसेच त्याबाबतचा सुधारीत अभिप्राय राज्यशासनास द्यावा, अशी मागणी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. त्यामुळे, पालिकेत नेमकी 23 गावे येणार की 21 याबाबत अद्यापही साशंकता निर्माण झाली आहे.

महापालिका हद्दीत 23 गावे घेण्यास राज्यशासनाने मान्यता दिली आहे. त्याबाबतचे आदेश पुढील दोन दिवसात निघण्याची शक्‍यता आहे. मात्र, ही गावे घेण्यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी 25 नोव्हेंबरला पाठविलेल्या पत्रात, मंतरवाडी गाव पूर्ण समाविष्ट करायचे आहे की या पूर्वी काही भाग समाविष्ट केला असून उर्वरीत भाग पालिकेत घ्यायचा आहे, याबाबतचा अभिप्राय पालिकेकडे मागविला होता.

मात्र, त्याच वेळी, 2014 मध्ये 34 गावे पालिकेत समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्यशासनाकडे पाठविण्यात आलेल्या अभिप्रायात मंतरवाडी व उरूळी देवाची ही दोन स्वतंत्र गावे असल्याचा अभिप्राय दिला होता. तर, त्याच अभिप्रायावर तत्कालीन उरूळी देवाची गावचे ग्रामविकास अधिकारी यांनी आपला अहवाल देताना मंतरवाडी हे स्वतंत्र गाव नसून ते उरूळी देवाची ग्रामपंचायतीचा भाग असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे या पूर्वीच उरूळी देवाची गाव पालिकेत आले आहे. त्यामुळे मंतरवाडी आधीच आले असल्याचे चित्र आहे.

न्यू कोपरे गावाबाबतही अशीच संधिग्ता निर्माण झाली आहे. शासनाने नवीन 23 गावात या गावाचाही समावेश केला आहे. मात्र, 2014 मध्ये शासनाने ही गावे घेण्याबाबत काढलेल्या आदेशात केवळ कोपरे या गावाचा उल्लेख आहे. तर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, न्यू कोपरे ग्रामपंचायत असवित्वात असल्याचे पण कोपरे व न्यू कोपरे एकच गाव असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर, दुसरीकडे न्यू कोपरे ही ग्रामपंचायत शिवणे व कोंढवे धावडे या महसूली गावांच्या काही क्षेत्रात आहे. तर, कोपरे गावची स्वतंत्र हद्द आहे. तसेच, या दोन्ही गावांच्या हद्दीत सलगता नाही. त्यामुळे ही दोन गावे वेगळी दिसत असली तरी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या मते एकच गाव असल्याने या गावांबाबतही पालिका संभ्रमात आहे.

दरम्यान, हा संभ्रम दूर करण्यासाठी महापालिकेकडून जिल्हा प्रशासनास पत्र पाठविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने या गावांचे महसूली रेकॉर्ड तपासून त्यानुसार, त्याची खातरजमा करून राज्यशासनाकडे योग्य अभिप्राय पाठवावा, अशी मागणी महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, त्यामुळे या गावांचे रेकॉर्ड तपासल्यानंतर तसेच जिल्हा प्रशासनाने आपला अभिप्राय दिल्यानंतरच महापालिकेत 23 गावे येणार की 21 हे स्पष्ट होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.